हिंगोली : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तेथे त्यांना चहा, नाष्टा, जेवण दिले जात आहे. मात्र काहीवेळा जेवण, नाष्टा देण्यात उशीर होत असल्याच्या तक्रारी उपचार घेत असलेल्या रुग्णांमधून येत आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १७ मे पर्यंत जिल्ह्यात १४ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १४ हजार ४३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर अशा रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले जात आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोना केअर सेंटरची संख्याही १८ झाली आहे. या सर्व ठिकाणी रुग्णांना आरोग्य सेवा दिली जात आहे. आरोग्य सेवेसाेबतच त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून कोरोना केअर सेंटरमध्येच चहा, नाष्टा, जेवण आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत झाली. मात्र कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांशी चर्चा केली असता, जेवण, नाष्टा, चहा देण्याच्या वेळांविषयी नाराजी व्यक्त केली. काहीवेळा जेवण, चहा, नाष्टा देण्यास उशीर होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कळमनुरी कोरोना केअर सेंटरमध्ये मिळते चांगले जेवण
कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णाला विचारणा केली असता, येथील कोविड सेंटरमध्ये जेवण नाष्टा, चहा चांगला मिळत असल्याचे सांगितले. तसेच जेवण, चहा, नाष्टा देण्याच्या वेळाही पाळल्या जातात. फक्त भात व पोळी एकाच डब्यात दिली जात असल्याने पोळी भिजत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा रुग्णालय
हिंगाेली येथील जिल्हा रुग्णालयातील जेवण व नाष्ट्याविषयी एका रुग्णाला विचारणा केली असता, जेवण बऱ्यापैकी असले, तरी अनेकवेळा नाष्टा, जेवण देण्यास उशीर होत असल्याची तक्रार केली. त्यामुळे नातेवाईक बाहेरून जेवणाचा डबा देत असल्याचे दिसून आले.
लिंबाळा कोरोना केअर सेंटर
लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन बऱ्या झालेल्या रुग्णास विचारणा केली असता, जेवण थोडे हलक्या प्रतीचे असल्याची तक्रार केली. मात्र जेवण, नाष्टा देण्याच्या वेळा पाळल्या जात असल्याचे सांगितले.
नवीन कोरोना सेंटर
हिंगोली बसस्थानक परिसरातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेतलेल्या एका रुग्णाने तक्रार केली आहे. जेवण, नाष्टा थोडा लवकर दिल्यास रुग्णांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
कोरोनाबाधित रुग्णांना चांगल्या प्रतीचे जेवण, नाष्टा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेळा पाळण्याविषयी जेवण पुरविणाऱ्यांना सूचना देऊन रुग्णांना वेळेवर जेवण देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर
१८
या सेंटरमध्ये सध्या दाखल रुग्ण
५३८