लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात २७ नोव्हेंबर पासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील एक ही बालक या लसीपासून वंचीत राहणार याची आरोग्य आणि शिक्षण विभागानी दक्षता घ्यावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी केले आहे.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गोवर-रुबेला लसीकरण मोहीम आढावा बैठकीत मिनियार बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. पुरुषोत्तम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मिनियार म्हणाले की, जिल्ह्यातील ९ ते १५ वयोगटातील ३ लाख १८ हजार २३० बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून सुमारे दीड महिना मोहीम राबविण्यात येणार आहे. हिंगोली तालुक्यात ७८ हजार ८३० बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३३ हजार, ३५० (४२ टक्के) उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर औंढा तालुक्यात ४७ हजार ५९८ पैकी १९ हजार ४०४ (४१ टक्के), वसमत तालूका ७६ हजार ८७३ पैकी ३३ हजार ९१७ (४४ टक्के), कळमनुरी ६४ हजार ५२७ पैकी २९ हजार ७३२ (४६ टक्के) आणि सेनगाव ५० हजार ४०२ पैकी २२ हजार ९२२ (४५ टक्के) एकूण ३ लाख १८ हजार २३० पैकी १ लाख ३९ हजार ३७१ (४४ टक्के) बालकांना आतापर्यंत लस दिली. जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांना गोवर-रुबेलाचे लसीकरण वेळेत होणे आवश्यक आहे. त्याशिवाय लसीकरण मोहीम बंद होणार नाही. मोहीम यशस्वीतेसाठी शिक्षण विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे केंद्रप्रमुख, तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी शाळानिहाय पालक प्रशिक्षण बैठक घेवून या मोहिमेबाबत जनजागृती करावी. तसेच पालकांच्या शंकाचे निरासन करावे. अंगणवाडीतील बालकांना लसीकरणाचे सत्र सुरु होणार असून, त्याकरीता महिला व बालकल्याण विभागाने योग्य नियोजन करुन ही मोहीम यशस्वी करावी. गोवर-रुबेला लसीकरण मोहीम ही शासनाची महत्त्वाची मोहीम आहे.शिक्षण आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करुन जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करत मोहीम वेळेत यशस्वी करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार दिले. यावेळी बैठकीस सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:25 AM