हिंगोली : कोरोनामुळे मजूर, कामगारांसह मध्यम वर्गीयांनाही चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनही विस्कटले आहे. शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना मोफत धान्य देण्यात येत असले तरी केशरी कार्डधारकांना दिलासा मिळाला नव्हता. आता केशरी कार्डधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५४ हजार ६९६ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे ते ऑगस्ट २०२० या चार महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. मात्र, काही लाभार्थ्यांनी अन्नधान्याची उचल केली नसल्याने या योजनेतील काही अन्नधान्य शिल्लक उरले आहे. त्यामुळे शासकीय गोदामामध्ये तसेच रास्त भाव दुकानामध्ये हे धान्य शिल्लक राहिले आहे. आता शिल्लक राहिलेले गहू व तांदूळ या अन्नधान्याचे वाटप राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून २०२१ साठी प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात गहू ८ रुपये तर तांदूळ १२ रुपये प्रति किलो दराने वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गरजू लाभार्थींना कोरोना काळात दिलासा मिळण्यास मदत मिळणार आहे.
बीपीएलच्या २६३५९ कार्डधारकांना लाभ
१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीपीएल कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२) त्यानुसार जिल्ह्यात रेशन दुकानांवर अन्नधान्य घेण्यासाठी लाभार्थी गर्दी करीत आहेत.
३) आतापर्यंत नेमके किती लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप झाले, याचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाकडे आला नसला तरी एकही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना प्रथम रेशन
शासनाने केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथम धान्य देण्यात येणार आहे. धान्य वाटप करण्यापूर्वी अन्नधान्याची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच दुकानात नोंदवही ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा कोट
शासनाच्या निर्देशानुसार केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दरात प्रति लाभार्थी १ किलो गहू व १ किलो तांदूळ देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात ६८.९०० मेट्रिक टन अन्नधान्य उपलब्ध आहे.
- अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी
जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक - १८८८७३
अंत्योदय - २६३५९
अन्नसुरक्षा - १३१८३८
शेतकरी - ३०७७६