वसमत : वाहतुकीचे नियम न पाळता वाहने बेदरकारपणे चालविण्याच्या घटना वाढल्या आहेत. आरटीओकडून कोणतीच कारवाई होत नाही. रस्ते सुरक्षा अभियानासारख्या माेहिमा फोटोसेशनपुरत्या घेतात. परिणामी, वाहनधारक बिनधास्त आहेत. एकट्या वसमत तालुक्यात शेकडो अवजड वाहनांना क्रमांक नसल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. दुचाकी व इतर वाहनांना तर नियमांचे बंधनच नाही. वाळू वाहतूक करणारी शेकडो ट्रॅक्टर टिप्पर विना क्रमाकांची राष्ट्रीय महामार्गावरून धावत असतात, हे विशेष.
नेहमीप्रमाणे दरवर्षी आरटीओच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. हे अभियान कागदोपत्री यशस्वी व प्रसिद्धीपत्रके काढून रस्ता सुरक्षा अभिायान संपविले जाते. प्रत्यक्षात कोणतीच कारवाई होत नाही. रात्रीच्या वेळी धावणाऱ्या वाहनांना, उसाच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर यांना रिफ्लेक्टरसुद्धा लावण्याची तसदी घेतल्या जात नाही. कार्यक्रमात भाषणबाजी केल्यानंतर रिफ्लेक्टर आरटीओ कार्यालयातील खाजगी दलालाच्या हाती सुपुर्त करून पुन्हा पुढच्या वर्षीच रस्ता सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम हाेत असल्याने वसमत तालुक्यातील वाहतुकीच्या नियमांच्या कायद्याला तिलांजली देण्याचा प्रकार होतो. आरटीओचे पथक फक्त परप्रांतातून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून असते. ओव्हरलोड वाहनांची तपासणी अधून-मधून होते.
वसतम तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली पासिंगच न करण्याची अघोरी पद्धत सुरू आहे. ट्रॅक्टर ट्रॉली यासह अवजड वाहनांवरही क्रमांक नसल्याचे चित्र आहे. हट्टा मंडळातील नदी घाटांवर वाळू उपसा करण्यासाठी दररोज शेकडो वाहनांची गर्दी होते. यापैकी ९० टक्के वाहन विना पासिंगची असल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळते. मात्र, आजवर एकदाही आरटीओच्या पथकाने याभागात येऊन तपासणी केल्याची घटना घडलेली नाही. हायवा, टिप्पर, ट्रॅक्टरसारखी वाहने जर विना क्रमांकाची विना पासिंगची भरधाव धावत असतील तर इतर वाहनांची काय अवस्था असेल यांची कल्पना न केलेली बरी. तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यांमध्ये अधून - मधून वाळूची वाहने पकडून लावली जातात. क्षमतेपेक्षा जास्त भाराची वाळू घेऊन येणारी वाहने विना क्रमांकाची असतात. जप्त वाहने विना क्रमांकाची असली तरी आरटीओने येऊन पाहणी करून कारवाई केल्याचे कधी ऐकवत नाही.
राष्ट्रीय महामार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन धावणाऱ्या जीप, ऑटो अशा वाहनांची संख्या वसमतमध्ये प्रचंड आहे. या वाहनांनाही कधी आरटीओचा धाक नाही. खरे तर वाहनधारकांना रस्ता सुरक्षा सप्ताहात मार्गदर्शनाची गरज असते. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावरून नियमांना तिलांजली देऊन धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, ऑटोचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना असतो की नाही, याची तपासणी कधी होत नाही. अल्पवयीन मुलेही प्रवासी घेऊन बेदरकारपणे वाहने चालवत असल्याचा प्रकार सर्रास दिसतो.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन नोंदणी निलंबनाची कारवाई करण्याचे प्रावधान आहे. मात्र, वाहनांची नोंदणीच न करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याकडेच आरटीओेचे लक्ष नसल्याने काय कारवाई होणार, हा प्रश्न आहे. रस्ता सुरक्षा अभियानात निदान यावर्षी तरी प्रत्यक्षात अभियान राबवून खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षित करण्याची गरज आहे.
बॉक्स
मालवाहतूक करणाऱ्या वाहनांतून वाळू वाहतूक करण्याचा प्रकार वसमतमध्ये उजेडात आला होता. नदीवरून वाळू घेऊन येणारे टाटा एस कंपनीचे ११ छोटाहत्ती वाहने तहसीलदारांनी नोव्हेंबर महिन्यात पकडली होती. मालवाहू वाहनातून अनधिकृत वाळू वाहतूक प्रकार चर्चेत आला होता. आठ दिवस वाहने तहसीलमध्ये उभी होती. मात्र, आरटीओने कधी चौकशी केली नाही. पोलीस ठोण आवारात, तहसीलमध्येही विना पासिंगची वाहने असतात. एकट्या हट्टा भागात जरी पथक गेले तरी शेकडो विना पासिंग ओव्हरलोडची वाहने दिसतील.