हिंगोली : कोरोनाचे संकट मोठे असले तरी अजून एकानेही कोरोनापुढे हात टेकले नाहीत. सर्वच जण त्याविरुद्ध खंबीर लढा देत आहेत. एकीकडे कोरोनाचा धीरोदत्त सामना करत असताना दुसरीकडे काही जणांनी विविध कारणांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात कोरोना आजाराने मागील वर्षभरापासून थैमान घातले आहे. जिल्हा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत आहे. नागरिकही कोरोना होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत आहेत. कोरोना झाला तरी योग्य काळजी व औषधोपचार मिळाल्यास अशा संकटावर नक्कीच मात करता येते, हे कोरोनाबाधित रुग्णांकडून शिकायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना झाला तरी त्याविरुद्ध ठामपणे लढा देत कोरोनावर मात करीत रुग्ण घरी परत येत आहेत. अद्याप तरी कोणीही कोरोनाला घाबरून टोकाचे पाऊल उचलले नाही. एकीकडे कोरोनाचे रुग्ण एवढ्या मोठ्या संकटावर मात करून जीवन जगण्याची उमेद निर्माण करीत आहेत, तर दुसरीकडे कोरोना काळात काही जणांनी विविध कारणांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे, सेनगाव, औंढा नागनाथ, नर्सी नामदेव, गोरेगाव पोलीस ठाणेअंतर्गत २०२० मध्ये ३८, तर २०२१ मध्ये ७ जणांनी विविध कारणांनी टोकाचे पाऊल उचलले.
संकट माझ्या एकट्यावर नाही
- जिल्ह्यात कोरोनाचे दररोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना झाला तरी कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल जात आहेत. यातूनच जगण्याची नवी उमेद इतर रुग्णांसमोर निर्माण होत आहे.
- संकट कितीही मोठे असले तरी त्याविरुद्ध जिंकता येते, हे घरी परतणाऱ्या रुग्णांकडून शिकता येत असल्याने कोरोनाला न घाबरता त्याचा खंबीरपणे सामना केला जात आहे.
कोरोनाचे संकट म्हणून एकाही आत्महत्याची नोंद नाही
हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या एकाही पोलीस ठाण्यात कोरोनाच्या संकटामुळे आत्महत्या केल्याची नोंद नाही. उलट सततची नापिकी, नोकरी लागत नसल्याने, दारूची नशा, कर्ज फेडण्याची चिंता, दारू पिण्याची सवय, फारकत झाल्याने तणावातून, परीक्षेत नापास झाल्याने, बायको नांदायला येत नसल्याने, व्यापारात नुकसान झाल्यानेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची पोलिसांत नोंद आहे.
...अशी आहे आत्महत्येची आकडेवारी
२०१९ - २७
२०२० - ३८
२०२१ - ०७