हिंगोली : ‘डेल्टा प्लस’ आजाराचा रुग्ण अजून तरी जिल्ह्यात आढळला नाही; पण नागरिकांनी दुर्लक्ष न करता मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
ताप येणे, कोरडा खोकला, घसा खवखवणे, छातीत दुखणे, धाप लागणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे ‘डेल्टा प्लस’ आजाराची आहेत. छातीत दुखू लागल्यास, कोरडा खोकला येत असल्यास, धाप येऊ लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दिलासादायक बाब म्हणजे हा आजार अजून तरी आपल्या जिल्ह्यात आला नाही. याबाबत डॉक्टरांना सल्ला घेऊनच औषध घ्यावी, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
कोरोना महामारीचे रुग्ण कमी होऊ लागल्याने काही जणांनी मास्क घालणे बंद केले आहे. बाजारपेठेत मास्क न घालता काही जण बिनधास्त फिरत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. बाजारात जाते वेळेस मास्क घालूनच जावे, वस्तू खरेदी करतेवेळेस सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहनही वारंवार आराेग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.