हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे महामंडळाने जिल्ह्यातील तिन्ही आगारांतून एकही बस ग्रामीण भागात किंवा पर जिल्ह्यात सोडली नाही. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व बसेस आगारात लावलेल्या आहेत.
१४ एप्रिलच्या रात्रीपासून १ मेपर्यत राज्य शासनाने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १४ एप्रिलपासून २४ एप्रिलपर्यत झिरोफाटा, रिसोड, वाशिम, अकोला, नांदेड या बसेस सुरु होत्या. या दरम्यान, शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रवाशांची तपासणी केली. परंतु, जिल्हा प्रशासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे २५ एप्रिलपासून जिल्ह्यातील तिन्ही आगारांतील सर्वच बसेस आता बंद करण्यात आल्या आहेत.एकही बस ग्रामीण भागात किंवा पर जिल्ह्यात पाठविण्यात आली नाही. सर्व बसेस आगारामध्ये लावल्या आहेत. जे कर्मचारी ड्युटीवर आहेत, अशांनीच ड्युटीवर यावे. ज्यांना ड्युटी दिली नाही त्यांनी इतरत्र न फिरता घरीच बसावे, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने एस. टी. महामंडळाला पत्र दिले आहे. महामंडळाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, २५ एप्रिल ते १ मेपर्यत तिन्ही आगारांतून बस बाहेर जाता कामा नये. पर जिल्ह्यातून बस आली असेल तर ती बस कोणाच्या परवानगीने जिल्ह्यात आली याची नोंद घ्यावी, असेही नमूद केले आहे.
परजिल्ह्यातील आगारांना केले भ्रमणध्वनी
२४ एप्रिलपर्यत पुसद, वाशिम, रिसोड, नांदेड या आगारांच्या बसेस जिल्ह्यातील तिन्ही आगारांतून ये-जा करत होत्या. या बसेसमधील सर्व प्रवाशांच्या नावासह कंट्रोल कार्यालयात नोंद केली जात होती. परंतु, २४ रोजी जिल्हा प्रशासनाचा नवीन आदेश
धडकताच सर्व आगारांना भ्रमणध्वनी करुन बसेस पर जिल्ह्यात न पाठविण्याची सूचना केली. त्यामुळे २५ एप्रिल रोजी एकही बस पर जिल्ह्यातून आली नाही. तसेच आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. -संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली
फाेटाे नं. १०