हिंगोली : जलेश्वर तलावाच्या पाळूवर व बुडित क्षेत्रावर अतिक्रमण करणाऱ्या १९५ जणांना तहसील कार्यालयाकडून पुन्हा एकदा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र नवीन अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई तहसीलने केली नाही. नगरपालिकेच्या अभियंत्यांनी पाहणी करून हे अतिक्रमण हटविण्यास सांगितल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
हिंगोली नगरपालिकेच्या वतीने यापूर्वी जलेश्वर तलावातील गाळ काढण्याची व सुशोभिकरणाची काही कामे झाली होती. मात्र ती टिकली नाहीत. दोन वर्षांपासून पुन्हा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र यात आधी अतिक्रमणधारकांची बाधा येत होती. त्यांनी तेव्हापासून अतिक्रमण हटविण्यास नोटिसा बजावल्या जात आहेत. मात्र सुशोभिकरणाचा प्रस्ताव मंजूर नसल्याने याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यांच्यासाठी जागा घेण्याची तयारीही नगरपालिका करीत होती. मात्र अव्वाच्या सव्वा दराचे प्रस्ताव सभेसमोर आल्याने ते फेटाळले गेले. आता न.प.ने पुन्हा सहा एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले. त्यातून जुन्या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन होईल. तर नवे काढून टाकण्यास सांगितले असून यासाठी अभियंत्यांना तलाबकट्टा भागात पाठविले होते, असे ते म्हणाले. तर या भागात यापुढे अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्यास न.प.च्या यंत्रणेलाही सांगितले.
आमदारांना भेटले शिष्टमंडळया नोटिसा मिळाल्यानंतर सैरभैर झालेल्या अतिक्रमणधारकांनी आज आ.तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले. त्यानंतर या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाबाबत मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी चर्चा केली. लवकरच या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळू शकते, असे संकेत मिळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांचीही उपस्थिती होती.