हिंगोली : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून खाजगी प्रवासी वाहतूक सेवा ठप्प पडली आहे. आता कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी इंधन दरवाढीने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे खाजगी प्रवासी वाहनांचीही आता १० टक्के दरवाढ झाल्याचे चित्र हिंगोली जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात काही वर्षांपासून अनेक जण प्रवासी वाहतूक व्यवसायात उतरले आहेत. सुरुवातीला इंधन दर कमी असल्याने प्रवासी वाहतुकीतून चांगले उत्पन्न हाती पडत होते. मात्र, कर्ज काढून, फायनान्सवर घेतलेली वाहने कोरोना संसर्गामुळे दीड वर्ष एकाच जागेवर होती. आता कुठे प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळाली होती. त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा तग धरेल, असे वाटत होते. मात्र, इंधन दरवाढीने वाहनमालक मेटाकुटीला आले आहेत. इंधनाचे दर वाढल्याने घेतलेले कर्ज, हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सध्या जिल्ह्यात १० ते १५ टक्के प्रवास भाडे वाढले आहे. असे असले तरी ट्रॅव्हल्स मालकांनी अद्याप तरी प्रवास भाडे वाढविले नसल्याचे दिसत आहे.
फायनान्सवर ५ सीटर जीप विकत घेतली. मात्र, काेरोनामुळे तब्बल दीड वर्ष वाहन जागेवरच उभे होते. त्यामुळे वाहनाचे हप्ते भरताना मोठी कसरत करावी लागली. आता कुठे प्रवासी वाहतूक सुरू झाली होती. मात्र, इंधन दर वाढल्याने प्रवासी वाहतूक परवडत नव्हती. त्यामुळे प्रवास भाडे दरात वाढ करावी लागत आहे.
- भाऊसाहेब पाईकराव, वाहन मालक
इंधन दरवाढीने प्रवासी वाहतूक परवडत नाही. चालकाचा खर्च, वाहनाचे हप्तेही निघत नव्हते. कोरोनामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. इंधन दरवाढीने खाजगी प्रवास भाडे दर वाढवावे लागत आहे.
-भुजंग मुसळे, चालक