हिंगोली : कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून, आता प्रशासनाने २०० जणांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटली आहे. दररोज एक किंवा दोनच रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे जवळपास सर्व व्यवहारांना रात्री १० वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यात ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळे करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता २०० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आयोजित करता येणार आहेत. कोरोनामुळे मंगल कार्यालयचालक, बँड पथक, स्वयंपाकी यासह यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता २०० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळे आयोजित करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घालून दिले असले तरी थोडा का होईना लग्नसोहळ्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. पुढील काळात लग्न तिथी असून, या काळात तरी नुकसान भरून निघेल, अशी आशा व्यावसायिकांना लागली आहे.
लग्नसमारंभासाठी या आहेत अटी
मंगल कार्यालय : बंदिस्त मंगल कार्यालये, हाॅटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के; परंतु, जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल. कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच व्हिडिओ रेकाॅर्डिंग आवश्यक आहे.
लॉन : खुल्या प्रांगणातील, लाॅनमध्ये हाेणाऱ्या विवाह सोहळ्यास प्रांगण किंवा लाॅन क्षमतेच्या ५० टक्के; परंतु, जास्तीत जास्त २०० व्यक्ती मर्यादेत असेल. तसेच लग्न सोहळा व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्याने लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस होणे आवश्यक आहे.
मंगल कार्यालय चालकांत उदासीनता
मंगल कार्यालयासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत आहे. या प्रक्रियेला अनेकजण कंटाळले आहेत. त्यामुळे मंगल कार्यालयाकडे नागरिक पाठ फिरवित आहेत. यात मोठे नुकसान होत आहे.
- गोकुळ ताेष्णीवाल, कळमनुरी
लग्न सोहळ्याला अनेक नातेवाईक येतात. परवानगीपेक्षा जास्त लोक आढळल्यास कारवाई होते. परवाना रद्द होण्याचीही भीती असते. त्यामुळे लग्नसोहळा आयोजित करताना मोठी खबरदारी घ्यावी लागत असल्याचे सांगण्यात आले.
लग्नाच्या तारखा
ऑगस्ट : १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१
सप्टेबर : १, ८, १६, १७
ऑक्टोबर : ८, १०, ११, १३, १४, १५, १८, १९, २०, २१, २४, ३०
नोव्हेंबर : ८, ९, १०, १२, १६
कोरोना कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी २०० लोकांना परवानगी दिली आहे. आगामी चार महिन्यात जवळपास २९ तिथी आहेत.
- रेणुकादास गुरु कुलकर्णी
रोजी सुरू झाल्याने बँडवालेही जोरात
कोरोनामुळे लग्नसोहळे कमी लोकांत होत होते. त्यामुळे बँडवाल्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. आता लग्नसोहळ्यासाठी २०० जणांना परवानगी दिल्याने रोजगार मिळेल.
- संभाजी वारुळे
लग्नसोहळ्याच्या ऑर्डर येतील, या अपेक्षेने बँड साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. नादुरुस्त साहित्याची दुरुस्ती केली जात आहे. मात्र आता बँडवाल्यांना मागणी आली तरच रोजगाराचा प्रश्न मिटेल.
- कैलास सुताडे