आता सभापतीपदासाठी लॉबिंग;हळूहळू काँग्रेसमध्येही वाढताहेत इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 07:53 PM2020-01-08T19:53:14+5:302020-01-08T19:55:30+5:30
महाविकास आघाडीची हिंगोली जिल्हा परिषदेत सत्ता आहे.
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापतीपदासाठी इच्छुकांची गर्दी होताना दिसत आहे. यापूर्वी सध्याच पद मिळणार नसल्याचे लक्षात येत असल्याने काहीसी मागे असलेली मंडळी आता जोर खाताना दिसत आहे.
महाविकास आघाडीची हिंगोली जिल्हा परिषदेत सत्ता आहे. यावेळीही ती कायम आहे. शिवसेनेला महिला व बालकल्याणऐवजी दुसरे सभापतीपद पाहिजे असल्याने तेवढी एक चर्चा रंगत आहे. तर काँग्रेसमधील मंडळी मात्र शिक्षण व समाजकल्याण ही दोन्ही सभापती पदे आपल्याकडेच राहणार असल्याचे गृहित धरून कामाला लागली आहे. शिक्षणसाठी दिलीपराव देसाई व कैलास सोळुंके हे इच्छुक व चर्चेतील नावे असली तरीही आता हळूच माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर गटाचीही एन्ट्री झाली आहे. या गटातील दोघेजण फिल्डिंग लावताना दिसत आहेत. तर दुसरीकडे समाजकल्याणसाठी कालपर्यंत डॉ.सतीश पाचपुते यांचेच नाव चर्चेत होते. इतर कुणी प्रयत्न करीत नसल्याचे दिसत होते. मात्र आता भगवान खंदारे, जाधव, राठोड हेही दावा ठोकू लागले आहेत.
शिवसेनेत महिला व बालकल्याण या सभापतीदासाठी फारसी चुरस नाही. यावेळी वसमत विधानसभेत हे पद जाईल, असे गृहित धरून सिंधूताई झटे यांचे नाव चर्चेत आहे. मागच्या वेळी हिंगोली विधानसभेत हे पद असताना यावेळी रुपाली गोरेगावकर यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र सेनेतील इच्छुकांना शिक्षण अथवा समाजकल्याण मिळण्याची अपेक्षा असल्याने अंकुशराव आहेर, फकिरा मुंढे, बाळासाहेब मगर आदींचेही प्रयत्न दिसत आहेत. राष्ट्रवादीत सभापतीपदालाही तेवढीच चुरस आहे. संजय कावरखे, राजेंद्र देशमुख, रत्नमाला चव्हाण यांची इच्छुकांत गणती असली तरीही उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात न पडल्याने यशोदा दराडे यांना हे पद दिले जाईल, अशी चर्चा होत आहे.