हिंगोली : काही दिवसांपूर्वी संपाचे हत्यार उपसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे न.प. संवर्ग कर्मचा-यांनाही आता इतर राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे २४ वर्षांच्या सेवेनंतर आश्वासित पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. हा आदेश लागू झाल्याची माहिती न.प.संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष व्ही.डी.घुगे यांनी दिली.
न.प. कर्मचा-यांचाही आता राज्यस्तरीय संवर्ग तयार झाला आहे. त्यांची राज्यातील कोणत्याही न.प.मध्ये बदली होवू शकते. त्यामुळे १२ वर्षे सेवेनंतर कर्मचा-यांना कालबद्ध पदोन्नतीच्या लाभासह २४ वर्षांनंतर आश्वासित पदोन्नतीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी कर्मचा-यांनी काही दिवसांपूर्वी संप पुकारला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न.प.कर्मचा-यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निर्णय झाला. आॅक्टोबर २00६ पासून आश्वासित प्रगती योजना लागू राहिल, तर या दिनांकापासून ते या आदेशाच्या तारखेपर्यंत काल्पनिक वेतननिश्चिती करून प्रत्यक्ष लाभ आदेशाच्या दिनांकापासून देण्याचे शासनाने म्हटले आहे. या निर्णयामुळे हजारो न.प. कर्मचा-यांना दिलासा मिळाला आहे.