१६ जानेवारी २०२१ पासून राज्यात लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ९.४९ लाख जणांना दोन्ही डोस द्यायचे आहेत. आतापर्यंत ३.५९ लाख जणांना पहिला तर १.०९ लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. हे काम फारसे समाधानकारक नाही. अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागप्रमुखांनी यात लक्ष घालून अधिनस्त कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यात संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे कारवाईचा इशाराही देता येणार आहे. जर लसीकरण झाले नाही, तर विभागप्रमुखावर याची जबाबदारी राहणार आहे.
२३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना उद्दिष्टपूर्तीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या लसीचे ५० हजार डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या कामात कुणी हयगय केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाईचा इशाराही दिला आहे. यासाठी जास्तीत जास्त जागृती करून लसीकरणाचा टक्का वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूण ३६ लसीकरण केंद्रांच्या ११५ सत्रांमधून २३ हजार जणांचे लसीकरण एकाच दिवशी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. २३ सप्टेंबरला यात किती जण लसीकरण करतील, यावर मोहिमेचे यश अवलंबून आहे. सर्व संबंधित यंत्रणांनाही याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार म्हणाले की, जिल्ह्यात सर्वत्रच विशेष मोहिमेत २३ सप्टेंबरला जास्तीत लसीकरण करण्यासाठी नियोजन केले आहे. सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला हातभार लावायचा आहे. ५० हजार डोस उपलब्ध असून, २३ हजार डोसचे नियोजन विशेष मोहिमेत केले आहे. आणखी काही असे सत्र घेतले जाणार आहेत.