नर्सी नामदेव (जि. हिंगोली) : आज देशात शासकीय नोकर भरती ठप्प झाली आहे. त्यामुळे हजारो मुले शिकून बेरोजगार झाली आहेत. तर ग्रामीण भागातील शिकलेल्या मुलांच्या हाताला काम मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित तरुण मुले नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून शहराकडे धाव घेत आहेत. मात्र, शहरात जाऊनसुद्धा उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे या नैराश्येतून अनेक तरुण युवक आपले जीवनच संपवून टाकीत असल्याच्या घटना घडत आहेत. याच नैराश्येतून देऊळगाव येथील रामेश्वर भारत कांबळे (वय २३) या युवकाने आत्महत्या केली.
हिंगोली जिल्ह्यातील देऊळगाव (जहां) येथील सुशिक्षित युवकाने आई-वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण न करता आले नाही. त्यामुळे पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिवाळी सणाच्या एक दिवस अगोदर २३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. देऊळगाव (जहां) येथील रामेश्वर भारत कांबळे (वय २३) हा युवक घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने तो बारावी पास होऊन पुणे येथील एका कंपनीत काम करत शिक्षण, पोलीस व आर्मी भरतीची तयारी करीत होता. तीन-चार वर्षांत त्याने अनेक भरतीमध्ये सहभागदेखील घेतला होता. मात्र, यामध्ये त्याला यश मिळाले नाही. आई-वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. आता गावाकडे कोणते तोंड घेऊन जावे. याच नैराश्येतून युवकाने आई-वडिलांच्या नावे एक चिठ्ठी लिहून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मयताच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.
आई, पप्पा, दादा मला माफ करा...मी तुम्हाला दाखविलेले स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. मला आता पुढचा रस्ता दिसत नसल्याने हाच मला शेवटचा पर्याय वाटत आहे. माझ्यामुळे कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मी सर्वांची माफी मागतो. मला माफ करा, अशा आशयाची चिठ्ठी गळफास घेतलेल्या ठिकाणी आढळून आली.