हिंगोली : जवळपास दहा ते बारा नगरांसाठी सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून मस्तानशाहनगर येथे काही महिन्यांपूर्वी दवाखाना थाटण्यात आला; परंतु, या दवाखान्यात कोणतीही सुविधा नसल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मस्तानशाह नगरातील नागरी आरोग्य केंद्र क्र. २ अंतर्गत वंजारवाडा, मंगळवारा, महादेववाडी, पेन्शनपुरा, खडकपुरा, गवळीपुरा, नाईकनगर, तालाब कट्टा, गांधी चौक, एनटीसी, बानखोली, आदी दहा ते बारा नगरांचा समावेश आहे. या नागरी आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी १, फार्मासिस्ट १, लॅब टेक्निशियन १, स्टाफ नर्स २, सिस्टर ६, सेवक असे जवळपास १३ आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत; परंतु, या नागरी दवाखान्यात कर्मचाऱ्यांसाठी ना शौचालयाची व्यवस्था, ना पाण्याची व्यवस्था. तिन्ही ऋतूंमध्ये येथील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही आमच्या व्यथा सांगाव्यात तरी कुणाला? असा सवालही या नागरी दवाखान्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात तर दवाखान्यात बसणेही कठीण होऊन बसते. पत्राच्या दोन खोल्या असल्यामुळे जागोजागी त्या गळतात. लिखापढी केलेली कागदपत्रेही भिजतात. उन्हाळ्याच्या दिवसांत तर प्रखर उन्हामुळे येथे बसणेही कठीण होऊन बसते. वेळोवेळी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. आज करू, उद्या करू, असे म्हणून वरिष्ठ वेळ निभावून नेतात, असेही या दवाखान्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.
अरुंद गल्ली; वाहने कुठे ठेवावीत?
मस्तानशाहनगर येथे नागरिकांच्या सोयीसाठी नागरी दवाखाना उभारला गेला आहे. येथे अरुंद गल्ली असल्यामुळे वाहने उभी करण्यासाठी जागाही नाही. कित्येक वेळा वाहतुकीची कोंडी होते. कधी-कधी कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काम सोडून वाहने बाजूला करावी लागतात. तात्पर्य, असे की अनेक समस्यांना या ठिकाणी सामोरे जावे लागत आहे.
प्रतिक्रिया
नागरी दवाखान्यासाठी इमारत मंजूर
नागरिकांना आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शहरातील मस्तानशाहनगर येथे नागरी आरोग्य दवाखाना दोन खोल्यांमध्ये उभारला आहे. परंतु, सदरील जागा अपुरी पडत असल्यामुळे वरिष्ठांना याबाबत कळविले आहे. या दवाखान्यासाठी इमारतीचे काम सुरू आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये हा दवाखाना टोलेजंग इमारतीत स्थलांतरित करून रुग्णांची गैरसोय दूर केली जाईल.
- डॉ. नामदेव कोरडे, तालुका वैद्यकीय अधिकारी
फोटो ४