हिंगोली : लोकार्पणानंतर १३ दिवस जुन्या इमारतीचा मोह नगर परिषद कर्मचाऱ्यांना सुटत नव्हता. परंतु, अखेर आदेश येताच सामानाची आवराआवर करत नवीन इमारतीत कार्यालयीन साहित्य हलविण्यास बुधवारी सुरुवात केली असून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा पहायला मिळत आहेत. राहिलेले दोन-तीन विभाग लवकरच येतील, असे न. प. अधिकाऱ्यांनी सांगितले.
१० कोटी १० लाख रुपये खर्च करून तीन मजली टोलेजंग इमारत बांधण्यात आली आहे. या तीन मजली इमारतीत जवळपास ३० ते ३० खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशीही कपाट, कागदपत्रांची गठ्ठे उतरवून कामगारांकरवी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर नेले जात होते. काही कामगार पायऱ्या झाडत होते तर काही जाळे व भिंतीला साफ करत असताना पहायला मिळाले. गुरुवारी घरकूल, स्वच्छता, बचतगट, प्रधानमंत्री आवास योजना विभाग, संगणक विभाग, आस्थापना विभाग, बांधकाम विभाग आदी कार्यालयाने कामकाज करणे सुरू केले असून, वसुली व पाणीपट्टी विभाग येणे बाकी राहिले आहे. दोन दिवसांत सर्वच कार्यालये नवीन इमारतीत येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्य गेटवरच केली वॉचमनची केली व्यवस्था
जुन्या इमारतीत मुख्य गेटवर वॉचमनची व्यवस्था नव्हती. त्यामुळे कोणी, कोणत्याही वेळी नगर परिषदेत जात होते. परंतु, नवीन इमारतीत मुख्य गेटवरच वॉचमनची व्यवस्था केली आहे. कोणत्या विभागात जायचे आहे याची विचारपूस आलेल्या व्यक्तीला वॉचमन करतील.
-बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक