लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील रस्त्यांच्या कामांची तपासणी करण्याचा आदेश नागपूर येथील आयुक्तांनी दिल्याने येथे यासाठी अभियंते नेमले आहेत. यापूर्वी थेट आयुक्तांनीच केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील काही गावांमध्ये कामे सुरू नसताना मस्टर, नोंदणी नसलेले मजूर असे प्रकार वाढले होते. आता ही नवी चौकशी काय रंग घेते, हे लवकरच कळणार आहे.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत कामे होत नसल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून कायम करण्यात येते. यासाठी विविध बैठकांमध्ये आवाज उठवून ही कामे वाढविण्याची मागणी केल्याचे दिसून आले. तरीही सिंचन विहिरी, शेततळी आदी कामांना समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत मोठे उद्दिष्ट दिलेले आहे. मात्र त्यातील कामांना मंजुरीच दिली नसेल तर ही कामे होणार कधी? हा प्रश्न आहे. त्यातही सिंचनाची सोय उपलब्ध करून देणारी कामे केल्याशिवाय इतर कामे करता येत नाहीत. त्यासह कुशल-अकुशल कामांचे प्रमाण अर्थात रेशो पूर्ण करून ही कामे करणे जिकीरीचेच असते. आता ही कामे करून रस्त्यांची कामे केलेली असल्यास अशा कामांचीही आयुक्तांकडून तपासणीचे आदेश आले आहेत. त्यामुळे तपासणी करण्यासाठी अभियंत्यांची पथके व तालुकानिहाय वेळापत्रक बनविण्यासाठीही आदेशित केले होते. त्यानुसार येथील जिल्हा परिषदेतही नियोजन झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अधिकारी लोकलेखा समितीच्या दौऱ्यावरून अद्याप न परतल्याने त्याची माहिती मिळू शकली नाही. या प्रकाराची आधी वेगळीच चर्चा रंगल्याने अनेकांच्या पोटात गोळा उठला होता. मग्रारोहयोच्या कामांची चौकशी लागल्याचे सांगितले जात होते. यापूर्वी घडलेले प्रकार लक्षात घेता आता नवीन काय घडणार ? याची चाचपणी काहीजण घेत होते. त्यामुळे ही चौकशीची बाब समोर आली.राज्यभर आदेश : स्थानिकांकडून चौकशीरस्त्यांच्या कामांची तपासणी करण्याचा हा आदेश एकट्या हिंगोली जिल्ह्यासाठीच नसून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत अशी तपासणी होणार आहे. त्यातही मोजकीच कामे या पथकांकडून तपासली जाणार आहेत. त्यामुळे या कचाट्यात आपलीच कामे सापडू नयेत, यासाठीही काहींनी देव पाण्यात घातलेआहेत. शेवटी स्थानिक अधिकाºयांकडूनच ही चौकशी होणार असल्याने काहींना मात्र याचे फारसे गांभिर्य नाही. या पथकाने कठोर भूमिका घेतल्यास मात्र काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती तेवढी आहे.यापूर्वी आयुक्तांनी तपासणी केल्यानंतर दोन अधिकाºयांचे निलंबन झाले होते. तर चौकशी करून ग्रामसेवक व इतरांवर कारवाईचा आदेश दिला होता. त्याचा अहवाल अजूनही गुलदस्त्यातच आहे.
नरेगातील रस्त्यांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:38 PM