लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : डॉक्टरकडून परिचारिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या नाट्यमय घटनेतील दुसरा अंक दहा दिवसानंतर बाळापूर ठाण्यात पूर्ण झाला. याप्रकरणातील पीडित परिचारीकेने बाळापूर ठाण्यात ठिय्या देत मला न्याय द्या, अशी आर्त विनवणी केली. परिचारिकेने विषारी द्रव्य खरेदीसाठी दुकाने धुंडाळली पण एकाही दुकानदाराने दिले नाही. अखेर ठाणेदार केंद्रे यांनी मतपरिवर्तन केले.आखाडा बाळापूर येथील रहिवाशी असलेले डॉक्टर व त्यांच्या वडिलाविरुद्ध पीडित परिचारिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला व तो देहूरोड पोलीस ठाणे पुणे येथे वर्ग करण्यात आला होता. सदर घटनेतील आरोपी डॉक्टरचा विवाह ठरल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणी आरोपींना अंतरिम जामीन मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच बरोबर आरोपी डॉक्टरचा विवाह असल्याचे समजल्याने पीडित तक्रारदार परिचारिका बाळापूर ठाण्यात आली. हा विवाह रोकण्यासाठी परिचारिकेने प्रयत्न केल्याचे सांगितले. विवाह उरकल्याचे कळल्यानंतर स्वत:चा जीव संपवावा यासाठी परिचारिकेने बाळापूरातील तीन कृषी केंद्रावर विषारी औषध खरेदीचा प्रयत्न केला. परंतु बाळापूर येथील दुकानदारांनी औषध विकले नाही. त्यानंतर परिचारिकेने बाळापूर ठाण्यात ओट्यावर ठिय्या मांडला. मला न्याय द्या, महिलांना फसविण्याचे प्रकार बंद व्हावेत, यासाठी मी लढतेय, असे सांगत तिने पत्रकारांजवळ सगळा प्रकार कथन केला. पुणे पोलिसांनी मला मदत केली नाही, बलात्काºयांना मदत केल्याचा आरोपही यावेळी केला. न्याय मिळाल्याशिवाय मी येथून हलणार नाही, असे बोलून ठिय्या मांडला. दोन तास या अन्याय नाट्याचा अंक चालला. बाहेर गेलेले ठाणेदार व्यंकट केंद्रे आल्यानंतर त्यांनी परिचारिकेची समजूत काढली. कायदेशीर बाजू समजून सांगून मत परिवर्तन केले. बीट जमादार शेख बाबर व महिला कर्मचारी सोलापूरे यांनी बसमध्ये बसवून दिले.
‘त्या’ परिचारिकेचा ठाण्यात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:18 AM