हिंगोली: एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला आहे. ज्योती गवळी असं नर्सचं नाव आहे. ज्योती गवळींनी आतापर्यंत जवळपास ५ हजार यशस्वी प्रसुती केल्या आहेत. मात्र त्यांनाच प्रसुती दरम्यान मृत्यूनं गाठल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला. गवळी यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
ज्योती गवळी गेल्या पाच वर्षांपासून रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांनी आतापर्यंत जवळपास ५ यशस्वी प्रसुती केल्या होत्या. बाळाला जन्म देत असताना ज्योती यांचा मृत्यू झाला. त्यांचं बाळ सुखरुप आहे. पण ज्योती यांच्या रुपात एक अतिशय हुशार आणि गुणी नर्स गमावल्यानं रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला ज्योती यांच्या कामाचं कौतुक करायच्या.
ज्योती गवळी सरकारी रुग्णालयात कार्यरत होत्या. स्वत:च्या प्रसुतीसाठी त्या याच रुग्णालयात २ नोव्हेंबरला दाखल झाल्या. ज्योतींवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनी बाळाला जन्म दिला. मात्र शस्त्रक्रियेनंतर ज्योती यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. प्रसुतीनंतर ज्योती यांचं रक्त मोठ्या प्रमाणात गेल्यानं त्यांना नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
ज्योती यांना उपचारांसाठी नांदेडच्या रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र काही वेळानंतर ज्योती यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना औरंगाबादला हलवण्याचं ठरवलं. मात्र त्याआधीच ज्योती यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्योती बऱ्या होतील, असं एकावेळी वाटत होतं. मात्र रविवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली, असं डॉक्टरांनी सांगितलं. ज्योती यांचं बाळ त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलं आहे.