लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियानात यंदा नवीन १३०० महिला बचत गट स्थापनेचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे. तर यावर्षी ८८० गटांना बँकेमार्फत ७ टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून विविध उपाय योजले जात आहेत. या महिलाही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती करू शकल्या पाहिजे, तसेच त्यांना सामूहिक विकासाच्या संकल्पनेत सहभागी करून घेण्यासाठी बचत गटांची स्थापना करण्यात येते. दरवर्षी जीवनोन्नती अभियानात अशा बचत गटांना विविध व्यवसायांसाठी मार्गदर्शन, कर्जपुरवठा केला जातो. जिल्ह्यातील अनेक बचत गटांनी चांगले काम केले असून नव्यानेही मोठ्या प्रमाणात बचत गटांची स्थापना होत आहे. काही बचत गटच आता स्वबळावर उभे राहिले असले तरीही अनेकांना बँकांच्या नकारघंटेमुळे कोणताही व्यवसाय उभा करता आला नाही.यावर्षी नवीन बचत गट स्थापनेसाठी तालुकानिहाय दिलेल्या उद्दिष्टानुसार हिंगोली २७०, वसमत ३००, औंढा २३०, कळमनुरी २५० आणि सेनगाव २५० या अशी १००० महिला बचत गटांची स्थापना होणार आहे.त्यांना प्रत्येकी १५००० हजारांचे खेळते भांडवल दिले जाणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सर्व तालुक्यांमध्ये यासाठी पंचायत समित्यांमार्फत कामेही सुरू करण्यात आली आहेत. यानुसार नवीन वर्षात ८८० गटांसाठी १५९६.०० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
८८0 बचत गटांना कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:53 PM