हिंगोली : तालुक्यातील नांदुसा येथे एका बारा वर्षीय मुलीचा गळा चिरून निर्घृन खून केल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अखेर या खूनाचा उलगडा झाला असून गावातीलच एका युवकाने प्रियंका शिवाजी कांबळे या मुलीचा खून केल्याची कबूली दिली. मयत प्रियंकाची मोठी बहिण स्नेहासोबत सदर युवकाचे प्रेमसंबंध होते. परंतु मयत प्रियंका ही प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यानेच आरोपीने ब्लेडने गळ्यावर सपासप वार करून प्रियंकाला ठार केले.
हिंगोली तालुक्यातील नांदुसा येथील शिवाजी कांबळे यांची १२ वर्षांची मुलगी प्रियंकाचा आरोपी बालाजी उर्फ गोपाल प्रेमदास आडे याने निर्घृन खून केला. कांबळे कुटंूबिय शेतात काम करण्यासाठी गेले होते, तेव्हा प्रियंका आणि तिचा सहा वर्षाचा भाऊ आशिष हे दोघेजण घरीच होते. याच दरम्यान बालाजी उर्फ गोपाल आडे याने घरात प्रवेश केला. यावेळी त्याने आशिषच्या हातात मोबाईल देऊन त्यास घराबाहेर एका झाडाखाली बसविले. आणि प्रियंकाचा गळा चिरून खून केला. काही वेळाने मयत प्रियंकाची मोठी बहिण स्नेहा ही घरी आली. यावेळी प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती तिने आई वडिलांना दिली. त्यानंतर शिवाजी कांबळे व त्यांच्या पत्नी घरी धावत आले. यावेळी प्रियंकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पाहताच आई व वडिलांनी एकच आक्रोश केला.
निर्दयता ! हिंगोलीतील नांदुसा येथे १२ वर्षीय चिमुकलीचा गळा चिरून खून
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी रामेश्वर वैंजणे, सपोनि राजेश मलपिलू सपोउपनि मगन पवार, प्रवीण राठोड, सचिन गोर्ले हे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी खूनी कोण? याचा शोध घेतला. परंतु याबाबत ठोस माहिती पोलिसांना मिळत नव्हती. घटनास्थळी रक्ताने माखलेली ब्लेड त्यांना आढळुन आली होती. बासंबाठ ठाण्याचे सपोउपनि मगन पवार यांनी तपासाची चक्रे फिरवत मयत मुलीचा भाऊ आशिषला विश्वासात घेत माहिती विचारली. तसेच यावेळी मयत मुलीच्या वडीलांचे सांत्वन करणारा आरोपी बालाजी उर्फ गोपाल आडे याच्या नखावर रक्ताचे डाग असल्याचे सपोउपनि पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिले. त्यामुळे अधिकच संशय बळावला. पोलिसांनी त्यास विश्वासात घेत ठाण्यात आणले व कसून चौकशी केली.
यावेळी आरोपी बालाजी उर्फ गोपाल आडे याने मयत मुलीची मोठी बहिण स्नेहा हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. परंतु मयत प्रियंका ही आम्हा दोघांच्या प्रेमात अडसर ठरत होती, म्हणून मी तिचा खून केला अशी कबूली आरोपीने दिली. याप्रकरणी मयत मुलीचे वडील शिवाजी कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडरवार आदींनी भेट देऊन पाहणी केली. परंतु हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.