नर्सी नामदेव (हिंगोली ) : पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर येणारी एकादशी म्हणजे परतवारी. या परतवारीला जिल्हाभरातील लाखों भाविक नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी तालुक्यातील नर्सी नामदेव येथे दाखल झाले आहेत.
जिल्हाभरातील ६७ गावांच्या दिंड्या नर्सीत रात्रीपासूनच दाखल झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन विठ्ठल नामाने नामदेव नगरी दुमदुमली. यावेळी भाविकांनी जय घोष करीत दिंडीत सहभाग घेतला. परतवारीच्या निमीत्ताने सकाळी ६ वाजता हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे, भिकाजी कदम, गणेश शिंदे, ओमप्रकाश हेडा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी संस्थानाचे पदाधीकारी उपस्थित होते.
सकाळी ४ वाजल्यापासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांची संख्या लक्षात घेता व दर्शन सुलाभ व्हावे यासाठी सर्वतोपरी खबरदारी नामदेव संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. मंदीर संस्थानने पथके स्थापन करुन सर्व त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्यामध्ये पोलीस प्रशासनाने बॅरेकेटची व्यवस्था केली होती. यावेळी पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी संस्थानाला भेट देऊन बंदोबस्थाची पाहणी केली तसेच सुरक्षेविषयी काही सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळ पासून अनेक मान्यवरांनी देवस्थानाला भेटी दिल्या आहेत.