लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : निराधारच्या प्रस्तावामध्ये तलाठी प्रमाणपत्रावर तलाठ्याची बोगस स्वाक्षरी, शिक्के मारणाºया तालुक्यातील वाघजाळी येथील एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील तहसील कार्यालयात १९ जानेवारी रोजी दाखल निराधार लाभार्थ्यांच्या प्रस्तावाची छाननी चालू असताना तालुक्यातील कहाकर बु. सज्जाअंतर्गत वाघजाळी येथील प्रयागबाई दत्ता मोरे, शोभाताई दत्ता मोरे, अखतर बी शेख नुर, शेख सयादिन शेख ईलाइ या चार निराधार लाभार्थ्यांच्या प्रस्तावात तलाठ्याची संशायस्पद स्वाक्षरी व बनावट शिक्के वापरल्याचे निदर्शनास आले होते. तहसीलदार वैशाली पाटील यांनी आधिक तपासणी केली असता बनावट स्वाक्षरी -शिक्के वापरले असल्याचे समोर आले. यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. चौकशीत गावातीलच संजय तुकाराम तांबिले यांच्याकडे ग्रामसेवक, तलाठी यांच्या स्वाक्षरी आणण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे तांबिले यांनी बनावट स्वाक्षरी व शिक्का यांचा वापर केला म्हणून तलाठी डी. एस. इंगळे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठ्याची बनावट स्वाक्षरी करणाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:23 AM