कळमनुरी : तालुक्यात १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून आहे. उमेदवारी अर्ज ४ जानेवारीपर्यंत मागे घेता येणार आहेत. याच दिवशी निवडणूक चिन्हांचेही वाटप होणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकरिता १९० मुक्त चिन्हे देण्यात आलेली आहेत. या मुक्त चिन्हात भेंडी अन् ढोबळी मिरचीचाही समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याकरिता उमेदवारांसाठी १९० मुक्त निवडणूक चिन्हे दिलेली आहेत. उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप ४ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. १०९ ग्रामपंचायतींच्या ८७५ सदस्यांसाठी २०८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांना ४ जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फतकरण्यात येणार आहे. १९० मुक्त निवडणूक चिन्हांत चहाची चाळणी, कुलूप चाबी, स्टेपलर, इंजेक्शन, जेवणाचा डब्बा, लॅपटॉप, हेल्मेट, चष्मा, पंखा, कंगवा, माऊस, पुस्तक पेटी, टेबल, पंखा आदी मुक्त चिन्हे दिलेली आहेत. उमेदवारांना यापैकी कोणतेही एक चिन्ह निवडणूक लढविण्याकरिता निवडता येते. तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने चिन्हाची यादी दर्शनी बोर्डावर लावलेली आहे. सर्व उमेदवारांना आतापासूनच निवडणूक चिन्हांची निवड करता यावी, यासाठी ही यादी दर्शनी भागावर लावलेली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना कोणतेही एक चिन्ह निवडणूक लढविण्याकरिता निवडता येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली.