आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या 71 वर्षीय वृद्धेची पैशाची पिशवी चोरट्यांनी लंपास केली आहे. पिशवीत रोख 20 हजार रुपये, पासबुक, एटीएम कार्ड, आधारकार्ड अशी कागदपत्रे होती.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील 71 वर्षीय महिला केसरबाई नानाराव पडघनकर या दिनांक 11 जानेवारी रोजी आखाडा बाळापूर येथे आठवडी बाजारात आल्या होत्या. दुपारी 4:00 वाजण्याच्या सुमारास बाजार करत असताना अचानक त्यांच्या अंगाला खाज आली. यामुळे त्या स्टेट बँक ऑफ इंडियासमोरील धनश्री दवाखान्यात उपचारासाठी गेल्या. उपचार घेत असताना हातातली पिशवी त्यांनी बाजूला ठेवली. हीच संधी साधत चोरट्यांनी पिशवी पळवली. पिशवीत वीस हजार रुपये रोख,पासबुक ,एटीएम कार्ड ,आधारकार्ड व इतर कागदपत्रे होती. केसरबाई पडघनकर यांच्या फिर्यादीवरून बाळापुर पोलीस ठाण्यात 12 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार नागोराव बाभळे करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजारात चोरटे सक्रिय झाले आहेत.
चोरट्यांवर अंकुश ठेवण्यात बाळापूर पोलिसांना अपयश आले आहे .चोरी गेलेल्या वस्तूंची तक्रारही नोंदवल्या जात नसल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत. बाजारात मोबाईल चोरीला गेला की तो हरवला आहे, अशी नोंद ठाण्यात केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. बाळापुर ही मोठी व्यापारपेठ असून पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने चोरटे सक्रीय झाले आहेत.