हिंगोली : येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मागील चार दिवसांपासून हळदीची आवक घटली आहे. तर सोयाबीनची आवक मात्र गत आठवड्याच्या तुलनेत दुप्पटीने वाढली असून, १९ ऑक्टोबर रोजी ५३० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. समाधानकारक भाव मिळत नसल्याने मात्र शेतकऱ्यांतून नाराजी पुढे येत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे आठवड्यापासून नवे सोयाबीन आले आहे. भाववाढीची अपेक्षा आहे. मात्र, मागील वर्षभरापासून सोयाबीनचे भाव जवळपास स्थिर आहेत. त्यातच भाववाढीची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांतून सांगण्यात येत असल्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे मोंढ्यात आवक वाढत आहे. गुरुवारी ५३० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. ४ हजार २०५ ते ४ हजार ६६४ रुपये भाव मिळाला.
दिवाळीनंतर भाववाढीची शक्यता...गतवर्षीचे सोयाबीन शेतकऱ्यांनी सात ते आठ महिने भाववाढीच्या अपेक्षेने विक्री केले नव्हते. परंतु, भाव काही वाढले नाहीत. आता जुन्यासोबत नवेही एकाच भावात विक्री होत आहे. आधीच उतार घटला असताना आता भावही समाधानकारक मिळत नसल्यामुळे लागवडही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर सोयाबीनचे भाव वधारण्याची शक्यता आहे.
हळदीचे दर आणखी घसरले...येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीच्या भावात घसरण सुरूच आहे. गुरुवारी ५५० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. १० हजार ६०० ते १२ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाली. ऑगस्टमध्ये या मार्केट यार्डात १५ ते १७ हजार रुपये क्विंटलने हळद विक्री झाली होती. आता भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.