हिंगोली: आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी श्रावणातील दुसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
२८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची प्रशासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर मध्यरात्री दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. कावड पताका घेऊन आलेले भाविक रात्रीपासूनच मंदिरा बाहेर थांबलेले होते. ‘हर हर महादेव’ चा जयजयकार करत होते. जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार विठ्ठल परळीकर, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
श्रावणातील दुसरा सोमवार लक्षात घेऊन गावोगावचे छोटे विक्रेते बेल, फूल रात्रीच घेऊन आले होते. मंदिर परिसरात फुलांची दुकाने थाटली गेली होती. मंदिर संस्थानच्या वतीने सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला होता. दुसरा सोमवार हा शिवामूठ वाहन्याचा होता. त्यामुळे महिला भाविकांनी श्री नागनाथाला शिवामूठ वाहिली.