वसमत (जि. हिंगोली) : मोंढ्यातील व्यापाऱ्यांची १२ लाख ६४ हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्या व्यापाऱ्यास शहर पोलिसांनी बार्शी येथून शुक्रवारी ताब्यात घेतले. त्या व्यापाऱ्यांनी तीन राज्यांतील अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याची कबुली दिली. शहरातील ३ व लातुरातील १ अशा ४ व्यापाऱ्यांना ४२ लाखाला गंडा घातल्याचे तपासात समोर आले.
वसमत कृउबा समिती मोंढ्यातील संजरी ट्रेडिंग कंपनीचे खदिर शेख दाऊद यांच्याकडून जानेवारीमध्ये १२ लाख ६४ हजारांची हळद साई ट्रेडिंग कंपनीचे विनोद साईगावकर (रा. वाशी-मुंबई) यांनी खरेदी करत फिर्यादी खदिर शेख यांना खोट्या स्वाक्षरीचा धनादेश देत फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. व्यापाऱ्यास गंडा घालणारा विनोद साईगावकर पोलिसांना गुंगारा देत होता.
पोलीस अधीक्षक राकेश एम. कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहपोलीस अधीक्षक यतीश देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी सपोनि पंढरीनाथ बोधणापोड, फौजदार बाबासाहेब खार्डे, सायबर सेलच्या फौजदार प्रतिभा कांबळे, बालाजी वडगावे, कृष्णा चव्हाण यांचे पथक तयार केले. त्या आरोपींची शोधमोहीम हाती घेतली होती.
विनोद साईगावकर हा बार्शी येथे आल्याची माहिती मिळताच २५ मार्चला बार्शी येथे सापळा रचून शहर पोलिसांनी व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या विनोद साईगावकर याच्या मुसक्या आवळल्या. कसून चौकशी केली असता महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील अनेक व्यापाऱ्यांना फसविल्याची विनोदने कबुली दिली. वसमत शहरातील ३ व्यापाऱ्यांना ३१ लाखास तर लातूर येथील एका व्यापाऱ्यास ११ लाख ५० हजारास फसवले आहे.