वारंगा फाटा ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे बुधवारी (दि.२७ ) रात्री बाळू उर्फ रामराव बळीराम पोटे (३८) हे रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी होते. आज पहाटे नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोटे यांना रानडुकराने जबर धडक दिल्याने त्यांच्या मेंदूला मार लागून ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना नांदेड येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. २७ मार्च रोजी दिवसभर त्यांच्यावर उपचार चालू होते. परंतु डॉक्टरांना त्यांना वाचण्यास अपयश आले आहे. २८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे.
दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरातील जंगल वृक्षतोडीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असून जंगलातील पानवठेदेखील कोरडेठाक पडले आहेत. वन्यप्राणीही पाण्याच्या शोधात माणवी वस्तीकडे येत आहेत. परिसरामध्ये ईसापूर धरणाचे पाणी शेतीसाठी असल्याने विविध बागायती पिके घेतली जात आहेत. वन्यप्राण्यांसाठी ते सोयीचे ठरत असून खाण्याची पिण्याची देखील सोय परिसरात होत आहे. जंगलातील वन्यप्राणी आता शेतातील पिकांत वास्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी ग्रामस्थांनी वन विभागाला अनेक तक्रारी करुनही कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नसल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच पोटे यांना जीव गमवावा लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यन्यांनी हल्ले केले आहेत. किरकोळ स्वरूपाची जखम झाल्याने त्याची तक्रार झाली नाही. या घटनेमुळे ग्रामस्थात भितीचे वातावरण पसरले असून वनविभागावर तिव्र रोष व्यक्त केला जात आहे.