निवडणूक आयोगाने माहे डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या न.प. व नगर पंचायतींची प्रभाग रचना सुरू करण्यास सांगितले आहे. आता एकसदस्यी पद्धत राहणार असून कच्चा आराखडा तयार केला जाईल. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमुळे प्रारूप प्रभाग प्रसिद्धी व आरक्षण सोडतीच्या सूचना नंतर देण्यात येतील. प्रभागाचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करण्यास सांगितले आहे. २३ ऑगस्टपासूनच ही कार्यवाही सुरू करण्यास सांगितले आहे. तर कच्चा आराखडा तयार होताच आयोगाला ई-मेल करण्यास सांगितले.
यासाठी २०११ च्या जनगणनेची आकडेवारी व नकाशे जमा करावेत, यानुसार सदस्यसंख्या निश्चित करावी, यासाठी समिती गठीत करावी, न्यायालय निर्देश विचारात घेऊन आराखडा तयार करावा, राजकीय दबावाला बळी पडू नये, योग्य स्पष्टीकरणासह प्रभाग रचना करावी आदी निर्देश दिले आहेत.
राजकीय हालचालींना येणार वेग
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव व औंढा नगर पंचायतींची मुदत संपल्याने तेथे प्रशासक आहेत. या ठिकाणी आधी प्रभाग रचनाही झाली होती. त्यामुळे आता निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा या ठिकाणी आहे. थंड पडलेल्या राजकीय हालचालीही आता गतिमान होतील. तर याच काळात हिंगोली, वसमत व कळमनुरी पालिकेचीही मुदत संपणार आहे. या ठिकाणी नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. तर येथेही आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
युती, आघाडीची खलबते सुरू
अजून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. मात्र युती व आघाडीची काय परिस्थिती राहील, अशा चर्चांना वेग आला आहे. नगर पंचायतींसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची बोलणी सुरू होती. मात्र निवडणुका लांबल्याने ही बोलणी अर्ध्यावर राहिली. आता सर्वच ठिकाणी कोण कोणाची सोबत घेईल, हे लवकरच कळणार आहे.