वसमत (जि. हिंगोली) : करणीच्या संशयातून खून करून नंतर मृतदेह वसमतजवळ रेल्वे रूळावर टाकल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून सुरेश सतोजी दातार, मारूती वामन दातार, किशन बापूराव जाधव (तिघे रा. म्हातारगाव) या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
वसमत ते चोंडी रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळावर ५ जानेवारी रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. ही आत्महत्या असल्याचे प्राथमिकदृष्ट्या भासत होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांनी मृताची ओळख पटवली. मृत हा वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील रामा माधव वाघमारे (५०) असल्याचे समजले.
या प्रकरणी मृताच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या वडिलास करणी करण्याच्या संशयावरून गावातील तिघांनी वसमत येथील दारूच्या दुकानासमोरून बळजबरीने मोटारसायकलवर उचलून नेले. जीवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह म्हातारगाव शिवारातील पटरीवर टाकला. या तक्रारीवरून सुरेश सतोजी दातार, मारोती वामन दातार, किशन बापूराव जाधव (तिघे रा. म्हातारगाव) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाघमारे यांना मोटारसायकलवर नेताना तिघे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. घटना वसमत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गुन्हा शहर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
चार दिवसांची कोठडीपोलिसांनी सुरेश सतोजी दातार आणि किशन बापूराव जाधव या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस निरीक्षक धुन्ने करीत आहेत.