हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुले अभ्यासात मागे राहू नये म्हणून याशिवाय पर्याय नाही. मात्र हे करताना मुलांच्या आरोग्याचा विचार करून वेळेचे बंधन पाळले जात नाही. दर तीन मिनिटांनी विश्रांती आवश्यक असताना तसे होत नाही. सलग तासिकांमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण पडून डोकेदुखीचा त्रास होत आहे. अनेकांना या नादात चष्मा लागला आहे. पालकांना या मुलांना दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ येत आहे.
लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढली
मोबाइल स्क्रीन तुलनेने खूप लहान असते. त्यावर लिहिलेले वाचताना मुलांच्या डोळ्यांवर ताण पडतो. अभ्यासक्रमातही लहान मुलांना मोठ्या अक्षरात अभ्यासक्रम दिला जातो. मोबाइलवर हे सूत्र पाळता येत नाही. शिवाय एकाग्रता ठेवावी लागते. याचा परिणाम म्हणून डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे मध्येच डोळ्यांची उघडझाप करणे गरजेचे आहे.
लहान मुलांना हे धोके
तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइल पाहिल्यास डोळ्यांवर ताण पडतो.
लहान आकाराच्या अक्षरांमुळे एकाग्रता करताना डोकेदुखी वाढते.
रेडिएशनचाही धोका जास्त संभवतो.
मोबाइलच्या अतिवापराने मुलांना चष्मा लागण्याची भीती असून इतरही त्रास होऊ शकतो.
मुलांना झेपेल एवढाच मोबाइल द्या
कोरोनामुळे शाळा ऑनलाइन झाल्या. त्याचा अभ्यासक्रम व इतर अवांतर बाबींसाठीही मुलांना मोबाइल दिला जातो. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. अभ्यासाच्या वेळी ब्ल्यू फिल्टर लाईट वापरावा, अंगापासून १५ इंच दूर मोबाइल धरावा, दर अर्ध्या तासांनी विश्रांती घ्यावी. डोळ्यांची दर पाच मिनिटांनी उघडझाप करावी. तसेच मुलांना झेपेल एवढाच मोबाइल द्यावा.
डॉ.सोनाली गोपाल कदम, नेत्रचिकित्सक
पालकही चिंतेत
गेल्या वर्षी मुलांना ऑनलाइनच शिक्षण घ्यावे लागले. यंदाही तीच परिस्थिती आहे. लहान मुलांना मोबाइलवरचे हे शिक्षण घेताना डोळ्यांना त्रास होत आहे. मात्र त्यांना शिक्षणापासून वंचितही ठेवता येत नाही. शाळांनी मात्र मुलांना मोबाइलचे दुष्परिणाम सांगून ते कसा धरायचा, किती वेळ सतत बघायचे आदीचे मार्गदर्शन केले पाहिजे. पालकांपेक्षा शिक्षकांचे मुले ऐकतात.
-अभिजित निंगूरकर, पालक
यंदा पुन्हा ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. एकतर यावर मुलांचा कायम गोंधळ असतो. मात्र नाईलाजाने हे शिक्षण द्यावे लागत आहे. त्यातच सतत मोबाइलवर राहिल्याने मुलांना डोळ्यांचा त्रास होत आहे. डोकेदुखीची समस्या वाढत आहे. आरोग्यावरही परिणाम होत असेल. यावर काही उपाय नसला तरीही दोन तासिकांमध्ये योग्य अंतर तरी ठेवले पाहिजे.
- गणेश बांगर, पालक