हिंगोली : जिल्ह्यात आता दीडशेच्या आसपास शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या असल्या तरीही पहिली ते बारावीपर्यंतच्या अनेक शाळा आतापर्यंत ऑनलाईन सुरू होत्या. आता सुरू झालेल्या शाळांमध्येही नववी ते बारावीचेच वर्ग आहेत. मात्र, या ऑनलाईनमुळे कोवळ्या मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनामुळे सर्व जगच थांबल्याचे चित्र होते. त्यात लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याचे सांगितले जात होते. शिवाय शाळेत एकत्र जमावे लागत असल्याने संसर्गाचा प्रसार होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असते. त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय समोर आला होता. यात अनेक शाळांत मुलांना विविध ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिकविले जात होते, तर काही वर्गांना अजूनही तसेच शिकविले जात आहे. विशेषत: जी मुले लहान आहेत, त्यांनाच या ऑनलाईनवर अभ्यास दिला जात आहे. त्यात मोबाईलवर या मुलांना तासन् तास बसावे लागत आहे. काहींनी त्यात संगणकांचा वापर सुरू केला आहे, तर काही जण टीव्हीची स्क्रीन वापरत आहेत. त्यामुळे लहान मुले सातत्याने या माध्यमांसमोर राहू लागली आहेत. त्यामुळे अनेकांना डोळ्यांचे विकारही होत आहेत. हिंगोली जिल्ह्यात पहिली ते बारावीची विद्यार्थीसंख्या २.३९ लाख आहे. यात मुलगे १ लाख २५ हजार ६८८, तर मुली १ लाख १३ हजार ९५६ आहेत. यामध्ये हिंगोली ६२ हजार १५३, सेनगाव ३६ हजार २४, वसमत ६० हजार ९०६, कळमनुरी ४६ हजार ९२८, तर आऔंढा तालुक्यात ३३ हजार ६३३ अशी एकूण विद्यार्थीसंख्या आहे. कोरोनाचा कहर अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे यंदा पूर्ण वर्षच ऑनलाईनवर काढण्याची वेळ येणार आहे. आणखी किती काळ हे चालेल, हेही कोणाला सांगता येणार नाही. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांना डोळ्यांचा त्रास होत असून, अनेक मुले तर यात रमत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.
ऑनलाईन शिक्षणाचे होणारे दुष्परिणाम
ऑनलाईन शिक्षण हा सध्या कोरोनामुळे एक उपाय म्हणून समोर आला तरीही अनेक दुष्परिणामही आहेत. मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा एक भाग आहे. तर मुले मोबाईलप्रेमी बनत आहेत. हाताळताना इतर विंडो उघडणार नाहीत, यावर लक्ष ठेवावे लागते. एकलकोंडे होण्याची भीती आहे. अध्यापनात दुहेरी संवादाचा अभाव आहे.
डोळ्यांना सर्वाधिक त्रास
ऑनलाईनमुळे मुलांच्या डोळ्यांना मोठा त्रास होतो. त्यातच मुले शाळेत व्यवस्थित बसतात. मात्र, घरी बसण्याची अडचण आहे. तसेच मोबाईल वापराची सवय वाढत आहे. त्यात चिडचिडेपणा येत आहे. इतरही अनेक तक्रारी आहेत.
- डॉ. गोपाल कदम,
बालरोग तज्ज्ञ
नुकसान होण्यापेक्षा बरे
कोरोनामुळे मुलांना शाळेत पाठविता येत नाही. लस येत नाही तोपर्यंत मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण देणे गरजेचे वाटते. यात मुलांना त्रास होत असला तरीही इतर काही उपाय नाही.
- राजेश कोंडावार,
पालक