वसमत (जि. हिंगोली) : येथे बोडूलँड नावाच्या बनावट ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाइन सेंटर चालू करून शासनाची व लॉटरी खेळणाऱ्यांची फसवणूक सुरू होती. याविरोधात वसमत शहर पोलिसांनी कारवाई करत सात लॉटरी सेंटरवर छापे मारून ४ लाख ६६ हजार ३८० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकाराने बनावट लॉटरी चालकांची साखळी उघड होण्याची शक्यता आहे.
वसमत शहरात ऑनलाइन लॉटरी चालविण्याचा परवाना नसताना बोडूलँड नावाच्या बनावट ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाइन सेंटर मान्यताप्राप्त आहे असे भासवून कमाईचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वसमत येथील आंबेडकर मार्केट, सत्याग्रह चौक, सिटी क्लब परिसर, बस स्टँडच्या समोरील शॉपिंग सेंटर, काैठा रोड, कारखाना रोड आदी भागात ऑनलाइन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट झाला आहे. शासनाची परवानगी आहे, शासकीय लॉटरी आहे असे भासवून शासन व लॉटरी खेळणारे या दोघांची फसवणूक करत होते. या प्रकारात कोट्यवधी रुपयांचा कर आजपर्यंत बुडवला गेला असल्याची भीती व्यक्त होत आहे. लॉटरी सेंटर चालक व त्यामागे असणारे त्यांचे पाठीराखे मालामाल झाले आहेत.
वसमत शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी सोमवारी रात्री सपोनि पंढरीनाथ बोधनपोड व त्यांच्या पथकाने वसमतमधील आंबेडकर मार्केट व सत्याग्रह चौक व इतर भागातील विनापरवाना चालणाऱ्या ७ ऑनलाइन सेंटरवर छापे मारले. एकाच वेळी सात ऑनलाइन सेंटरवर छापे मारल्याने एकच खळबळ उडाली. ही कारवाई सपोनि पंढरीनाथ बोधनपोड, पोउनि खार्डे, ढेंबरे, वडगावे, गुंडरे, भगीरथ सवंडकर यांच्यासह पोलिसांचा ताफा होता.
याप्रकरणी सपोनि बोधनपोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख अलीम शेख रहीम, विकी श्रीकिशन गोंडगे, साईनाथ बालाजी जाधव, राजा सीताराम अवधूतवार, राहुल धबडगे, सुधीर जोंधळे, धर्मपुरी नारायण राचेवार यांच्याविरोधात फसवणुकीचा व लॉटरी ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील चार जण पोलिसांच्या तावडीत सापडले असून इतर फरार आहेत. विनापरवाना चालणाऱ्या लॉटरी सेंटरवर छापे पडल्याने लॉटरी सेंटर चालकांचे पाठीराखे यांच्यात खळबळ उडाली आहे. कारवाई होऊ नये प्रकरण मिटावे यासाठी अनेकांनी मध्यस्थी केल्याचीही चर्चा आहे; मात्र अवैध धंदे चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही मध्यस्थी करणारे दलाल यांच्याविरोधातही कारवाई होईल अशी भूमिका अशी पोलीस निरीक्षक गुरमे यांनी घेतली आहे. (फोटो २१)