लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यात विविध राज्यांतून ५ हजारांपेक्षाही जास्त ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. मात्र अभियान अंतर्गत केवळ १३५८ कामगारांची नोंद शासन दरबारी करण्यात आली.कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी, शासनाकडून नियोजन केले जात नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी कामगार योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. शासनाकडून हिंगोली जिल्ह्यात १९ नोव्हेंबर २०१८ पासून ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना’अंतर्गत विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. ऊसतोड कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जरी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले असले तरी, योजनेची माहिती कामगारांना कारखाना सुरू होण्यापूर्वी देणे आवश्यक होते. तसे न झाल्याने योजनेसाठी लागणारे कागदपत्रे सोबत कामगारांनी आणलीच नाहीत. परराज्यात येणाऱ्या ऊसतोड कामगारांनी आधारचा पुरावा सोडला तर इतर कागदपत्रे सोबत नव्हती. त्यामुळे कागदपत्र अभावी अनेकांना नोंद करणे शक्य झाले नाही. या योजने अंतर्गत प्राथमिक टप्प्यामध्ये विविध प्रशासकीय विभागाअंतर्गत सुरू असलेल्या घर बांधणी, वृद्धाश्रम व शैक्षणिक योजनांकरिता संबंधित प्रशासकीय विभागांनी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.घरबांधणी योजनेमध्ये इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई नागरी, ग्रामीण आवास योजना इ. योजनांचा प्रथम टप्प्यात समावेश आहे. शैक्षणिक योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जातीकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांचा समावेश आहे.जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातर्फे कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगार विशेष नोंदणी अभियानची अंमलबजावणी करण्यात आली. ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी दोन पथकाद्वारे कामगार ज्या ठिकाणी आहेत तेथे जाऊन नोंदणी करण्यात आली. विशेष नोंदणी अभियान राबवून जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील १३५८ ऊसतोड कामगारांची नोंदणी पथकाने करून घेतल्याची माहिती एन. एस. भिसे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ज्या कामगारांची अभियानात नोंदणी करण्यात आली आहे, त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यातील चार ठिकाणच्या साखर कारखान्यावर जाऊन तेथील ऊसतोड कामगारांची नोंदणी पथकाद्वारे करण्यात आली. नोंदणीसाठी आधार, पॅनकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, फोटो ही कागदपत्रे घेतली.
केवळ १३५८ ऊसतोड कामगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:26 AM