कळमनुरी (जि. हिंगोली) : दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, असे मत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी आपले येथे व्यक्त केले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी येथील तोष्णीवाल मंगल कार्यालयात शेतकरी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. संजय लोंढे, लातूरचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले, विठ्ठल देशमुख, जिल्हाध्यक्ष रॉबर्ट बांगर, बाळू खिल्लारे, बंटी पाटील, शिवलिंग बोधने, आनंद कदम आदींची उपस्थिती होती.
आ. बच्चू कडू म्हणाले, पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातून १५० दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे आली आहे. यावर कार्यवाही करण्यासाठी ही यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ केला आहे. आपल्या पक्षाकडून लाडका मुख्यमंत्री, लाडका खासदार, लाडका आमदार ही योजना जाहीर करणार असून त्यांना प्रहारकडून दीड हजार रुपये महिना दिला जाईल, असेही ते म्हणाले, आगामी विधानसभेत आम्ही शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुद्यावर लढणार आहोत. राजकीय पक्षांनी धर्माचे झेंडे हाती घेतल्यामुळे त्यांचे खाली लक्ष नाही, आर्थिक विषमता दूर झाली पाहिजे.
जातीयवादी मानसिकता संपवा व काम करणाऱ्यांना साथ द्या, आपली नाळ ही जातीशी न जोडता दुःखासोबत जोडा. भाजपा धर्म व हिंदुत्व म्हणतेय, काँग्रेस जातीचे बोलतेय, आम्ही मात्र शेतकरी व कष्टकऱ्यांचे बोलतोय, सामान्य लोकांच्या दु:खाबाबत आम्ही बोलतोय. काम करणाऱ्यांना साथ द्या. शेवटच्या माणसाला आपल्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे, जातीयतेमध्ये घरं पेटल्या जात आहेत, असे सांगून मानवतेचे बीज पेरल्या गेले पाहिजे. दिव्यांगांसाठी मी पंधरा वर्षांपासून लढत आहे. जाती, धर्माच्या नावावर पेटू नका. सध्या सोयाबीनला हमीभाव नाही, शेतकरी जगला पाहिजे, असे आ. बच्चू कडू म्हणाले.
प्रहारचे १५ ते २० आमदार आले तर व्यवस्था बदलून टाकू. ग्रामीण भागात घरकुलासाठी कमी तर शहरी भागात जास्त निधी दिला जातो, हा दुजाभाव संपला पाहिजे, असेही ते म्हणाले. ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केेले.