लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : बाळापुर पोलीस ठाणे हद्दीत बोल्डा फाटा येथे खुलेआम अवैध धंदे सुरू असून बाळापूर पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. बोल्डा फाटा येथील प्रवासी निवाऱ्यातच सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारून कारवाई केली आहे. चार हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. बाळापुर पोलीस कारवाई करण्याऐवजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून या धंद्यांवर कारवाईचा सपाटा सुरू आहे. बोल्डाफाटा व परिसरात खुलेआम देशी दारू, अवैध गावठी दारू, मटका जुगाराचा धंदा सुरू आहे. परंतु याकडे बाळापूर पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसते. बोल्डाफाटा परिसरात गेल्या काही दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार ठिकाणी अवैध दारू केंद्रांवर व तीन मटका अड्ड््यांवर धाडी मारल्या आहेत. काल ६ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बोल्डा फाटा येथील जनता हॉटेल च्या बाजूला असलेल्या प्रवासी निवाºयातच खुलेआम मटका खेळला जात होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारून कल्याण नावाचा मटका खेळविणारा एकास ताब्यात घेतली. त्याच्याजवळील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ४४४० रुपये जप्त केले. याप्रकरणी गणेश उत्तमराव राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी कैलास उत्तमराव भारती (राहणार पोत्रा) व विवेक पांपटवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष नागरगोजे करीत आहेत.पोलीस अधीक्षकांनी नेमलेले विशेष पथक बाळापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अवैध धंदे बंद झाल्याचा दावा करत असले तरीही बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत मात्र अवैध धंदे तेजीत आहेत.वेळोवेळी होणाºया कारवाईवरून हे दिसून येत असून बाळापूर पोलिसांना अवैध धंदे बंद करण्यात सपशेल अपयश आले आहे.बोल्डा बीटमध्ये वारंवार कारवाई झाल्यानंतरही ठाणेदार मात्र कोणतीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच 'गुफ्तगू 'रंगली आहे.
प्रवासी निवाऱ्यातच खुलेआम मटका; एलसीबीची पुन्हा धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:16 AM