हिंगोली जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान सलग पाच दिवस ४२ अंशांपेक्षा जास्त तापमान होते. त्याचा फटका केळी पिकास बसला. त्यामुळे विमा कंपनीने काही भागांसाठी विमाही मंजूर केला. मात्र, डोंगरकडा मंडळात दोन दिवस तापमानात ०.१४ अंशांचा फरक आल्याने विमा नाकारला होता. तर शेजारच्या गिरगांव मंडळात मात्र याच काळात सलग पाच दिवस तापमानाची नोंद ४५ अंश सेल्सिअस झाली होती. त्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रातच तांत्रिक अडचण असल्याचा मुद्दा उपस्थित करून याची चौकशी करून संबंधितांना विमा देण्याची मागणी खासदार राजीव सातव यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली होती. त्यानंतर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांनी कृषी आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून परभणी कृषी विद्यापीठामार्फत स्वयंचलित हवामान केंद्राची चौकशी झाली. त्यात वडगाव येथील हवामान केंद्रानजीक बांधकाम व सभोवतालच्या झाडांमुळे तापमानाच्या नोंदीत फरक पडू शकतो, असा निष्कर्ष त्यांनी दिलेल्या अहवालात मांडला आहे. त्यामुळे अल्पशा फरकामुळे या शेतकऱ्यांचा विमा नाकारला जावू नये. तो मंजूर करण्यात यावा, असे पत्र कृषी आयुक्तांनी कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न चर्चेत आहे. त्यामुळे आता तो निकाली निघण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.