हिंगोली : जिल्ह्याचे ठिकाण असूनही येथे स्वतंत्र स्त्री रुग्णालय नसल्याने सगळा भार जिल्हा रुग्णालयालाच सोसावा लागत होता. आता ४२.४२ कोटी रुपये खर्चाच्या या रुग्णालयाचा आराखडा सादर करण्याचा आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याने हिंगोलीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हिंगोलीसह राज्यातील १५ जिल्ह्यांच्या ठिकाणी स्त्री रुग्णालय नसल्याने ते उभारण्यासाठी राज्य शासनाने २०१३ मध्ये परवानगी दिली होती. हिंगोली येथील स्त्री रुग्णालयासाठी दिवंगत खा. राजीव सातव यांनीही पाठपुरावा चालविला होता. हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आवश्यक खाटांची व्यवस्था करण्यासाठी हे रुग्णालय वेळेत उभे राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच हे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव समोर आला. यासाठी ही जागा अपुरी पडते की काय? असा प्रश्न समोर होता. मोजणीअंती ही जागा पुरेशी असल्याचे समोर आले आहे. त्यातच थोडी अधिकची जागा मिळाल्याचेही सांगण्यात आले.
जागेचा प्रश्न निकाली निघाल्यानंतरही जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून याबाबत तेवढ्या गतिमान हालचाली होत नाहीत. या ठिकाणी प्रभारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना असे नवे प्रस्ताव देण्याची फुरसत नसते. मात्र एका डॉक्टराकडेच पदभार कायम ठेवण्यात प्रशासनाला काय रस आहे? हे कळायला मार्ग नाही. तरीही शासनानेच या रुग्णालयासाठी मंजुरीचा पुढाकार घेऊन आता आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. हा आराखडा वेळेत पोहोचणे तेवढेच गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयाच्या दप्तरदिरंगाई कारभाराचा फटका कायम अशा विकासाच्या बाबींना बसत आला आहे. यालाही त्याचा अपवाद ठरेल असे वाटत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तरी याबाबत जागरूकता दाखविणे गरजेचे आहे. या आराखड्यानंतरच शासनाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्याचे काम होईल.
आयुष रुग्णालयाच्या जागेचा प्रश्नही कायम
हिंगोली जिल्ह्यासाठी ३० खाटांचे आयुष रुग्णालयही मंजूर झाले आहे. याबाबत खा. हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. या रुग्णालयासाठी जिल्हा रुग्णालयानजीकचीच वळू माता प्रक्षेत्राची जागा देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पशुसंवर्धन विभागाकडे पाठविला आहे. मात्र त्यालाही अद्याप मंजुरी मिळाली नाही. खा. पाटील यांनी यासाठी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनाही पत्र दिले. मात्र त्याचेही काहीच झाले नाही. जागेअभाही हे आणखी एक रुग्णालय मंजुरीतच राहते की काय? असा प्रश्न आहे.
...तर वैद्यकीय महाविद्यालय कसे होणार?
वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीनशेपेक्षा जास्त खाटांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. केवळ रुग्णालयांना मंजुरी मिळून चालणार नाही, ही कामे पूर्ण करून त्या ठिकाणी यंत्रणा उभी राहणे आवश्यक आहे. त्यानंतरच येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे दिवंगत खा. राजीव सातव यांचे स्वप्न साकार होणार आहे. त्यादृष्टीने मात्र हालचाली दिसत नाहीत. यासाठी येथे मंजूर झाल्यानंतर होऊ घातलेल्या आरोग्य संस्थांची कामे गतीने होणे गरजेचे आहे.