लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डीएपी हे महागडे खत शेतकऱ्यांना परवडत नसल्याने त्याला पर्याय म्हणून सेंद्रिय डीएपीच्या नावाखाली अनेक कंपन्यांनी खते बाजारात आणली आहेत. मात्र त्यांना परवाना आहे की नाही, याचा संभ्रम सुरू असून छापे मारल्यानंतर गायब झालेला माल पुन्हा बाजारात विक्रीला येत आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यात कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात छापे मारले. यामध्ये वसमत तालुक्यात २, औंढा तालुक्यात ३, हिंगोली तालुक्यातील ३ दुकानांत छापे मारल्यानंतर ३२५ बॅग सेंद्रीय डीएपी जप्त करण्यात आली होती. यामध्ये खरोखरच डीएपीसारखे कंटेंट आहे का? हा प्रश्न आहे. मात्र त्याची कोणतीच तपासणी केलेली नसते. शिवाय सेंद्रीय खतांच्या पोत्यांवरही तसे कुठेच लिहिलेले नाही. शासनाने यंदा बियाणे व खते कंपन्यांच्या नावाची यादीच जारी केली आहे. या यादीत ज्या कंपन्यांची व त्यांच्या उत्पादनाची नावे नाहीत, त्यांची उत्पादने बाजारात आल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र तरीही बाजारात अशाप्रकारे खते येत असल्याने कृषी विभागाने पुढाकार घेत कारवाई केली होती. डीएपी हे मूळ खत महागडे असल्याने शेतकºयांना या सेंद्रीय डीएपीची भुरळ घालण्यासाठी एक साखळीच कार्यरत केली जात होती. यात तीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत मनाला वाटेल त्या दरात ही डीएपी मिळत होती, असे शेतकºयांनीच सांगितले. त्यामुळे काहींना संशय आल्याने त्यांनीही कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई झाली. अजूनही असे प्रकार थांबले नसून काहींनी छाप्यामुळे थांबवलेली विक्री पुन्हा सुरू केल्याचे दिसते.खते, बियाणे :तालुकानिहाय नमुन्यांची आकडेवारीकृषि अधीक्षक कार्यालयाने ६ तर उपसंचालकाने ५, तालुका कृषिअधिकारी हिंगोली ५, औंढानागनाथ ८, कळमनुरी ५, वसमत ६, सेनगाव ५, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांनी ६५ असे एकूण १०५ बियाणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. तर खताचे यामध्ये जि. प. कृषिविभागाने १, औंढा ८, वसमत ६, कळमनुरी ९, सेनगाव ९ असे एकूण ३३ नमुने घेतले.तर जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाने खताचे २, उपसंचालकाने २, तालुका कृषि अधिकारी औंढा ४, वसमत २, हिंगोली २० असे एकूण ३० खताचे नमुने घेतले आहेत. जि. प. कृषि विभागाने १२, तालुका कृषि अधिकारी औंढा २०, वसमत १८, हिंगोली १८, कळमनुरी २१, सेनगाव २१ असे एकूण १९ बियाणांचे नमुने घेतले.जर सेंद्रीय डीएपी अथवा परवाना नसलेल्या कंपनीची खते बाजारात आल्याची शंका शेतकºयास असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधीक्षक विजय लोखंडे, कृषी विकास अधिकारी अंकुश डुब्बल यांनी केले.
सेंद्रिय डीएपीचा कहर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:10 AM