मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ९ ते ११ पूजन व पाळणा, ११ ते १ रांगोळी स्पर्धा यामध्ये १ ते १५ वर्षे, तर दुसरा १५ ते पुढील असे दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत, तसेच ५ ते १० वयोगटात संतांचे अभंग, गडकिल्ल्यांची प्रतिकृती व संवाद, ऐतिहासिक महिलांची वेशभूषा या ऑनलाइन पद्धतीने आयोजित कार्यक्रमाचे बक्षीस वितरण होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसरात दीपोत्सव होणार आहे.
या बैठकीत जिजाऊ ब्रिगेडच्या महासचिवपदी जया सावके, शहर संघटक सीमा मगर, शहर समन्वयक रेखा देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्षा राजश्री क्षीरसागर, वंदना आखरे, राधिका देशमुख, नीता सावके, वर्षा सरनाईक, सुनीता कव्हर, वृषाली पाटील, छाया मगर, सीमा मगर, सुनीता सवनेकर आदींची उपस्थिती होती.