२९ जानेवारी रोजी नगरसेवक ॲड. इलियास नाईक यांनी नगर परिषदेला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, उद्यानामध्ये हुतात्मा स्मारकही आहे. तसेच या उद्यानामध्ये झाडे, गवत, शोभेच्या वस्तू व लहान मुलांच्या खेळण्याची साधने येथे उपलब्ध करून दिलेली आहेत. मागील एक वर्षापासून उद्यानामध्ये देखरेखीसाठी कोणीही नसल्याने उद्यानाची दुरवस्था होत आहे. देखरेखीसाठी कोणीही नसल्याने कोणीही गेट ओलांडून आत येत आहेत.
कळमनुरी शहरवासियांसाठी विरंगुळा म्हणून हे उद्यान कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले आहे. मात्र, सध्या देखरेखीअभावी उद्यानाची दुरवस्था होताना दिसून येत आहे. मोकाट जनावरे उद्यानामध्ये येत आहेत. महागामोलाच्या वस्तूही चोरीला जाण्याची शक्यता आहे. उद्यानाची देखभाल करण्यासाठी वॉचमन अथवा एखाद्या सेवकांची नियुक्ती करण्याची मागणी निवेदनात केली आहे. येत्या पंधरा दिवसांत देखरेखीसाठी वाचमन अथवा सेवक न नेमल्यास न. प. कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.