लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांनी ११ रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात घेतली.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांचा मोबाईल व आधार क्रमांकाचे सिडींग तसेच ई-केवायसी पडताळणी दिनांक ३१ जानेवारीपूर्वी करून घेण्याचे आवाहन केले. याची वेळेत पूर्तता न झाल्यास शिधापत्रिका निलंबित करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या बैठकीला तहसीलदार अरविंद बोळंगे, नीलेश पळसकर, मुजीब पठाण, शेख एजाज तसेच पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी व रास्त भाव दुकानदार उपस्थित होते. यावेळी संगेवार म्हणाल्या, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जानेवारीच्या धान्याचे लाभार्थ्यांना वाटप करताना रास्त भाव दुकानातील ई-पॉस उपकरणामधील ई-केवायसी व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर झाला पाहिजे. ३१ जानेवारीपूर्वी प्रत्येक रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करावा. ३१ जानेवारीपर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्या शिधापत्रिकांवर मागील तीन महिन्यात धान्य उचलण्यात आले नाही, अशा सर्व शिधापत्रिका तपासणीअंती तात्पुरत्या निलंबित करण्यात येतील. धान्य अनुज्ञेय नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येतील, असे सांगितले. सर्व रास्त भाव दुकानदार व त्यांचे सर्व लाभार्थी यांनी ३१ जानेवारीपूर्वी आधार सिडींग, मोबाईल क्रमांक सिडींग तसेच लाभार्थी सत्यापन करुन घेण्याचे आवाहन संगेवार यांनी केले.