लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना थेट जवळच्या शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. शाळा उघडण्यापूर्वी जिल्ह्यात मोहीम राबवून शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेशित करण्यासाठी नियोजनही करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र शाळा उघडण्यापूर्वी शोधमोहीम राबविली नाही. तसा अहवालही वरिष्ठांकडे सादर केलेला नाही.बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा शासनाने संकल्प केला आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जातो. या बालकांना जवळच्या शाळेत थेट प्रवेश दिला जातो. सर्व शिक्षा अभियानअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन हजारो बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. परंतु यावर्षी ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. वर्षभर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेशित करण्याच्या सूचना आहेत. शहर, गाव, तांडा वस्ती दुर्गम भागात जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र मागील काही महिन्यांपासून मोहिमचे काम संथपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. हिंगोली शहरात सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बालके शाळाबाह्य असल्याचे दिसून येत आहे.चौकशीही नाहीशहरात विविध ठिकाणी कामांवर मजुरांसमवेत चिमुकले दिसत आहेत. त्यांना शाळा प्रवेशासाठी अजूनही कोणी साधी विचारणाही केली नाही. एकीकडे प्रवेशोत्सव होत असताना दुसरीकडे या भटक्यांच्या मुलांना मात्र पोटाच्या खळगीचीच भ्रांत राहणार आहे.
शाळाबाह्य बालके वाऱ्यावरच... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:08 AM