हिंगोली : प्रलंबित लेखाआक्षेपांच्या गर्तेत अडकून पडलेली ५६८ कोटींची रक्कम लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताद्वारे समोर येताच याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. हे आक्षेप निकाली काढण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यास त्यांनी बजावले.हिंगोली जिल्ह्यात जि.प.च्या १३ विभागांसह पाच पंचायत समित्यांचे मिळून सहा हजार लेखाआक्षेप प्रलंबित आहेत. या आक्षेपांबाबत संबंधित विभागप्रमुख गांभिर्य दाखवत नाहीत. त्यामुळे ते तसेच साचून राहतात. यात काही आर्थिक आक्षेपही आहेत. या आक्षेपांमध्ये अडकलेल्या रक्कमेबाबतची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने मागविली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेने ही माहिती जमविली. त्यात तब्बल ५६८ कोटींची माया अडकल्याचे समोर आले होते. यातील सर्वच आक्षेपांमध्ये गैरव्यवहार नसेलही. मात्र ज्यामध्ये आहे अशा प्रकरणांत कारवाई करणे शक्य आहे. तर ज्या प्रकरणात जुजबी कारण आहे, अशांचे अनुपालन करून तो निकालीही काढता येतो. मात्र एवढे करूनही काहीच होत नसल्यास त्यात पोलीस कारवाई करण्याचीही मुभा आहे. आता हे आक्षेप निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांना मुख्य कार्यकारी अधिकारी एस.पी. तुम्मोड यांनी सूचना दिल्या आहेत. तर हे आक्षेप निकाली न निघाल्यास संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यासही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत आता विभागप्रमुख गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. ठरावीक उद्दिष्ट देवून हे आक्षेप निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
लेखाआक्षेपांचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 1:01 AM