हिंगोली : जिल्ह्यातून श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी दरवर्षी जाते. या पालखीत हजारो भाविक पायी पंढरपूर येथे जातात. तर अनेक भाविक एसटीने जाऊन दर्शन घेतात. जाताना पालखीसोबत जाऊन दर्शन घेतल्यानंतर येताना एसटीने परतणाऱ्या भाविकांची संख्याही जास्त आहे. भाविकांची संख्या लक्षात घेता हिंगोेली आगारातून ३० गाड्या पंढरपूरसाठी सोडल्या जातात. यातून ४ ते ५ लाखांचे उत्पन्न आगाराला मिळते; मात्र कोरोनामुळे दोन वर्षांपासून पालखीला परवानगी दिली जात नाही. तसेच एसटीही बंद आहे. त्यामुळे भाविकांसह एसटीलाही फटका सहन करावा लागत आहे.
स्थानकप्रमुखांचा कोट............................
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी जवळपास ३० गाड्या सोडल्या जात होत्या. यातून हिंगोली आगाराला उत्पन्नही मिळत होते. मात्र कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. सलग दोन वर्षांपासून उत्पन्नाला मुकावे लागत आहे.
- संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली
एसटी पालखीलाही परवानगी नाही
पंढरपूर येथे भरणाऱ्या आषाढीवारी सोहळ्यासाठी शासनाने केवळ मानाच्या दहा पालखी दिंडी सोहळ्यास परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. नर्सी येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी नेण्यासाठी मंदिर संस्थानने प्रशासनाकडे परवानगी मागितली. मात्र अद्याप प्रशासनाने परवानगी दिली नाही.
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
- जिल्ह्यातील महत्त्वाची पालखी म्हणून श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी आहे. या पालखीसोबत हजारो भाविक पायी वारी करतात. इतरही काही पालख्या जातात.
- यासह विदर्भातून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या हिंगोलीमार्गे मार्गक्रमण करतात. शेगाव येथील संत गजानन महाराज पालखी डिग्रस कऱ्हाळे, जवळा बाजार येथे मुक्कामी थांबते. इतरही पालख्या जिल्ह्यात मुक्कामी थांबतात.
वारकऱ्यांचेही गावी मन रमेना !
मागील पंचवीस वर्षांपासून न चुकता पंढरपूरची वारी करतो; मात्र कोरोनामुळे मागील वर्षीपासून विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. यावर्षी तरी पालखीला परवानगी मिळेल असे वाटत होते; परंतु यंदाही दर्शनाला मुकावे लागणार आहे.
- बाबाराव सुरुशे, डिग्रस कऱ्हाळे
मागील अनेक वर्षांपासून विठ्ठलाचे नामस्मरण करीत पायी दिंडीत जाण्याचे भाग्य मिळाले; मात्र गतवर्षीपासून कोरोनामुळे पंढरपूरला जाता आले नाही. यावर्षी किमान एसटीने तरी पंढरपूरला जाता येईल असे वाटत होते; परंतु एसटीलाही अद्याप परवानगी देण्यात आली नाही.
-गंगाराम फाजगे, सवड
बसेस दरवर्षी पंढरपूरसाठी सोडल्या जायच्या - ३०
रुपये उत्पन्न मिळायचे एसटीला - ४ लाख
- प्रवासी एसटीतून दरवर्षी प्रवास करायचे ४ हजार