सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील पानकनेरगाव येथील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी अखेर १७ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सेनगाव पोलिस ठाण्यात नऊजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे.
पानकनेरगाव येथील आकाश माणिकराव देशमुख (वय २३) हा चार दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथून गावी आला होता. व्हाॅट्सॲपवर मोबाइल संदेश टाइप करून तो गावातून निघून गेला होता. सेनगाव पोलिसांसह नातेवाईक त्याचा शोध घेत असताना १७ ऑगस्ट रोजी पानकनेरगाव शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी मृताचा भाऊ सचिन माणिकराव देशमुख याने सेनगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुलीच्या प्रकरणात मृत आकाशला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यावरून मधुकर दांडगे, शुभम दांडगे, सोनाली संदीप दांडगे, ज्ञानेश्वर दांडगे (सर्व रा. पिंपळगाव, ता. भोकरदन, जि. जालना), भाऊराव देशमुख, शिला भाऊराव देशमुख, रामेश्वर भाऊराव देशमुख (रा. पानकनेरगाव, ता. सेनगाव) व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संभाजी खाडे या नऊजणांविरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सोनकांबळे करीत आहेत.