हिंगोली : जिल्ह्यात विविध चार पोलीस ठाणे हद्दीत चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. परभणी येथून दोन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख ५५ हजार रूपयांसह १ लाख ६६ हजार २०० रूपयांचे सोने-चांदीचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावांत ग्रामस्थ गस्त घालत आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनांचा उलगडा करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिल्या आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. यात हिंगोली ग्रामीण, वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक एका तर सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील दोन चोरीच्या घटनांत परभणी येथील चोरट्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यावरून पोलिसांनी शेख खयूम शेख रफिक, शेख रहिम उर्फ शेरा शेख चाँद (दोघे रा. दर्गारोड, कुर्बाणी शाह नगर, परभणी) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे विचारणा केली असता चारही ठिकाणच्या चोरीच्या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी त्यांचेकडून १ लाख ११ हजार २०० रूपयांचे सोने-चांदीचे दागिणे व रोख ५५ हजार रूपये असा एकूण १ लाख ६६ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, सुनील गोपीनवार, पोलीस हवालदार संभाजी लेकूळे, भगवान आडे, किशोर कातकडे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, नितीन गोरे, ज्ञानेश्वर साळवे, तुषार ठाकरे, शेख जावेद आदींच्या पथकाने केली.