हिंगोली : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यान्वये वंचित घटकातील बालकांसाठी देण्यात येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ४७८ बालकांची निवड करण्यात आली. यापैकी ३०१ बालकांचा प्रवेश निश्चित झाला असून १७८ बालकांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी आणखी मुदतवाढ मिळाल्याने या काळात हे प्रवेश निश्चित होतील, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ७९ शाळांमध्ये ५३० राखीव बालकांना मोफत प्रवेश देण्यासाठी आरटीईअंतर्गंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोरोनामुळे दोन ते तीन वेळा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर ५३० जागांसाठी ९८७ बालकांचा ऑनलाइन अर्ज शिक्षणविभागाकडे आले होते. पहिल्या फेरीत ४७८ बालकांची निवड करण्यात आली. या जागांवर प्रवेश देणे सुरू झाले असून कोरोनामुळे दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात ३०१ बालकांचा प्रवेश निश्चित झाला असून १७८ जणांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे. मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यात तरी पालकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुसऱ्यांदा मुदतवाढ
ऑनलाइन अर्ज आल्यानंतर पहिल्या फेरीत निवड झालेल्या बालकांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी ११ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे अनेक पालकांना पाल्याचा प्रवेश निश्चित करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पालकांच्या अडचणी काय ?
२५ टक्के राखीव जागेवर निवड झालेल्या पालकांना शाळेवर गेल्यानंतर विविध कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यामुळे ही कागदपत्रे काढताना पालकांची धावपळ होत आहे.
- राजू इंगोले
आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागेसाठी मुलाचा ऑनलाइन अर्ज भरला आहे. सध्यापर्यंत प्रवेशासंदर्भात मेसेज आला नाही. परंतु, प्रवेशावेळी एखाद्या कागदपत्राअभावी प्रवेश तर थांबणार नाही ना याची चिंता लागली आहे.
-भाऊसाहेब पाईकराव
५० टक्केच प्रतिपूर्ती
२०१९-२० मध्ये ५६ शाळांनी ५०७ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला होता. मात्र २६ शाळांनीच विद्यार्थ्यांची परिपूर्ण माहिती ऑनलाइन सादर केली होती. त्यांना ५४.३८ लाख रुपये मंजूर झाले. ही रक्कम ५० टक्केच असून उर्वरित शाळांची रक्कम कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे.
वेटिंगवरील पालकांना चिंता
बालकांना मोफत २५ टक्के राखीव जागेवर प्रवेश मिळावा यासाठी पालकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. निवड झालेल्या पालकांनी प्रवेश घेण्यास सुरुवात केली. त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित असला तरी वेटिंगवरील पालकांना पाल्याच्या प्रवेशाची चिंता लागली आहे.
एकूण जागा - ५३०
आतापर्यंत झालेले प्रवेश - ३०१
शिल्लक जागा - २२९
तालुकानिहाय शाळा आणि जागा
तालुका शाळा जागा शिल्लक जागा
औंढा १२ १०४ ६२
वसमत १८ ८८ ३०
हिंगोली २६ ११४ ६६
कळमनुरी १६ १७० ४९
सेनगाव ०७ ५४ २२