हिंगोली : जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी समोर व बाजूला मोकळी जागा असतानाही दवाखान्याच्या प्रवेशद्वारारच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अतोनात त्रास होत आहे.
‘गरिबांचा दवाखाना’ म्हणून जिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते. गावोगावचे रुग्ण येथे उपचारासाठी येतात. परंतु, काही वाहन चालक चारचाकी व दुचाकी वाहने मोकळ्या जागी उभी न करता दवाखान्याच्या प्रवेशद्वारावरच उभी करतात. याचबरोबर रुग्णवाहिकाही अस्ताव्यस्तपणे उभ्या केल्या जात आहेत. वाहने व इतर बाबींची देखरेख करण्यासाठी स्वतंत्रपणे दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असतानाही दवाखान्याच्या प्रवेशद्वारावरच वाहने उभी केली जात आहेत. यामुळे येथे येणाऱ्या-जाणाऱ्या रुग्णांना तसेच नातेवाईकांना त्रास होत आहे.
नियुक्त केलेले गार्ड नावालाच
जिल्हा सामान्य रुग्णालयाने रुग्णांची तसेच नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, वाहने व्यवस्थित लावली जावीत यासाठी स्वतंत्रपणे दोन ते चार गार्डची व्यवस्था केली आहे. परंतु, ऐनवेळेस हे गार्ड कुठे जातात हाही प्रश्न आहे. दवाखान्याच्या प्रवेशद्वारावरच वाहने उभी केली जातात, हे गार्डला कसे कळत नाही? हाही मोठा प्रश्न आहे. जिल्हा रुग्णालयात वाहनतळ नसेल तर ते तयार करावे व रुग्णांना दवाखान्यात जाताना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.
फोटो न. १०